महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विरोधात समाजकार्य करणार : नवले काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर अकोलेतील नेत्यांची पत्रकार परिषद; आमदारांवरही डागली तोफ

नायक वृत्तसेवा, अकोले
पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आम्हांला विचारात घेतले नव्हते, विचारले असता तोपर्यंत त्यांचा निर्णय झाला होता. त्यावेळी व्यक्ती प्रेमापोटी आम्ही भाजप बरोबर गेलो होतो, वैचारिकदृष्ट्या नव्हे. आम्ही मुळात डाव्या विचारसरणीचे असल्याने कम्युनिस्ट पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षाला मनापासून स्वीकारले आहे. यापुढे भाजपच्या विरोधात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्य करणार असल्याचे पक्षप्रवेशानंतर स्पष्टीकरण अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी दिले आहे.

मुंबईतील गांधी भवन येथे मोजक्या समर्थकांसह प्रातिनिधिक स्वरूपात पक्षप्रवेश केल्यानंतर शनिवारी (ता.16) अभिनव शिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, विद्यार्थी नेते मदन पथवे, रमेश जगताप, शिवाजी नेहे, आरिफ तांबोळी, विक्रम नवले आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ नेते नवले म्हणाले, आम्ही नेहमी डाव्या चळवळींचे पुरस्कर्ते राहिलो असून आमच्यावर असलेला विचारांचा पगडा व काँग्रेस पक्षाची चळवळ, संस्कृती यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापुढे काँग्रेस संघटन बळकट करणे हाच एकमेव उद्देश असून आता स्वगृही आल्याचे समाधान मिळत आहे. भाजप विचारसरणी ही कधीही मान्य नव्हती. परंतु राजकारणात काही वळणे अनिश्चितपणे घ्यावी लागतात. आता मात्र भाजपच्या विरोधात राहूनच समाजकार्य करावयाचे आहे. कारण भाजपमुळे ग्रामीण भाग, शेतकरी उध्वस्त झाला असून युवक बेरोजगार झाले आहेत. देशाला भवितव्यच राहिले नाही. भांडवलशाही प्रत्येक क्षेत्रात येत असल्याने पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे मोठे उद्योजक सर्व क्षेत्र काबीज करण्याचा डाव आखत आहेत. त्यामुळे भारत देश पुन्हा पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा देश बांधणीत मोठा वाटा असून स्वातंत्र्य मिळवण्यात मोठे योगदान दिल्यानंतर स्वतंत्र भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले. अनेक प्रश्न मार्गी लावून देश प्रगतीपथावर आणला आहे. जागतिकीकरणाच्या काळात मंदी रोखण्यात यश मिळविले. काँग्रेस काळात फक्त जिझिया कर उकळलेले नसून सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. आता काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवून चाराचे चाळीस कसे होतील याकडे लक्ष केंद्रित करणार आहे असे नवले यांनी स्पष्ट केले.

मीनानाथ पांडे म्हणाले, माझा भाजपमध्ये जाण्यास प्रखर विरोध होता. परंतु नेतृत्वाच्या मागे जावे लागले. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नव्हती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करताना नवीन नेतृत्वाने मानसन्मानाची वागणूक दिली नाही, आमची त्यांना गरज वाटली नाही. मात्र, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला. त्यांची ती संस्कृती व विचार नेहमी आदर्श राहिले आहेत. कार्यकर्त्यामुळे नेता घडत असतो, परंतु अकोले तालुक्यात कधीही कार्यकर्त्याला मान सन्मान दिला गेला नाही ही खंत आहे. पदे दिली म्हणजे मानसन्मान मिळाला असे होत नाही म्हणून आम्ही फरफटत न जाता सन्मानाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मदन पथवे म्हणाले, माझ्या आजोबांपासून माझ्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा आहे. काँग्रेस संस्कृती जवळची वाटली म्हणून हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्षात सध्या विचारांचे राजकारण होत नसून त्यांच्याकडे कोणतीही दिशा नाही. रमेश जगताप म्हणाले, आमचे मन कधीही भाजपचा विचार स्वीकारू शकत नाही. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात नंतर हजारो कार्यकर्त्यांसह मधुभाऊ नवले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अकोल्यात गेल्या चाळीस वर्षांत विविध पदे दिली गेली पण मान-सन्मानाची वानवा आहे. तसेच विद्यमान आमदारांकडे एक वर्षात विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याचे जाणवले म्हणून काँग्रेस प्रवेश केला.
– मीनानाथ पांडे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस)

