आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात डॉ.सोमनाथ मुटकुळे सन्मानित सर्वोत्तम पुरूष व्यक्तिरेखेसाठी मिळाले नामांकन; ‘राहत’लाही मिळाले नववे नामांकन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैद्यकीय सेवेत असूनही आपल्या कलागुणांना वाव देऊन रसिकांची भूक भागविणारे संगमनेरातील प्रसिद्ध औषधी तज्ज्ञ डॉ.सोमनाथ मुटकुळे यांना नुकतेच लघुपटातील पुरूष व्यक्तिरेखेसाठी ‘सर्र्वोत्तम पुरूष व्यक्तिरेखा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2020 मध्ये सादर झालेल्या ‘राहत’ लघुपटातील भूमिकेसाठी त्यांना गौरविण्यात आले.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी असंख्य रुग्णांवर उपचार करत अनेकांना नवसंजीवनी दिली आहे. याचबरोबर त्यांनी अभिनय क्षेत्राला वाहून घेतल्याने येथेही ते उत्कृष्ट अभिनय सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. अनेक समाजप्रबोधनपर नाटक, नाटिका, एकपात्री प्रयोग आणि लघुपटांतून रसिकांची भूक भागविली आहे. नुकतीच त्यांनी ‘राहत’ लघुपटात पुरूष व्यक्तिरेखा साकारुन रसिकांना आचंबित केले आहे. नाशिक लघुपट महोत्सवात जगभरातून आलेल्या विविध भाषांतील सुमारे 650 लघुपटांत ‘राहत’ने विविध गुणांना पात्र ठरत नववा क्रमांक मिळवला आहे. तर डॉ.मुटकुळे यांना सर्वोत्तम पुरूष व्यक्तिरेखेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीवर ज्वलंत वास्तव मांडण्यासाठी ‘राहत’ लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेरातील दर्जेदार कलाकारांनी एकत्रित येऊन हा लघुपट उंचीवर नेऊन ठेवला. नुकताच तो नाशिक येथील आंतराराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये सादर करण्यात आला. येथे उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची वाहवा मिळवत हृदयात स्थान मिळवले. याचे लेखन व दिग्दर्शन वसंत बदावणे, कला दिग्दर्शन रूपाली बंदावणे यांनी केले असून संकलन अनिल कोल्हे यांनी केले आहे. कलाकार म्हणून डॉ.सोमनाथ मुटकुळे, वंदना बंदावणे, सूर्यकांत शिंदे, अंतून घोडके, ज्योती जाधव आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. लिनिअर फिल्म निर्मित हा लघुपट ठाणे आणि पुणे येथे होणार्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्येही दाखल करण्यात असल्याचे चमूने सांगितले आहे.
कसदार कलाकार म्हणून ओळख मिळविलेल्या डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी समाजप्रबोधनाचा हेतू ठेवून आजपर्यंत पाचशेच्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘पुन्हा क्रांतीज्योती’चे एकपात्री प्रयोग सादर केलेले आहेत. याचबरोबर त्यांच्या जीवनावरील पुस्तकही प्रकाशित करण्याचा मनोदय आहे. लवकरच त्याला मूर्तरुप मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.