नेवासा पोलिसांत बालविवाह प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्याबद्दल खासगी चाईल्ड लाईनच्या कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांत मुलीच्या आईवडीलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर येथील चाईल्ड लाईनचे कर्मचारी प्रवीण श्याम कदम (वय 27, रा.एकनाथनगर, केडगाव, ता.नगर) यांनी नेवासा पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी 2 डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून सलाबतपूर येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला आहे अशी माहिती दिली होती. त्यानंतर फिर्यादीसह चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी याबाबत सखोल माहिती घेतली. या मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच तिचे आई व वडील यांनी तिचा बालविवाह दिनेश गंगाधर तेलुरे (रा.शेवगाव) याच्याशी लावून दिला. नवरा मुलगा त्याचे वडील गंगाधर वामन तेलुरे व आई तारामती गंगाधर तेलुरे यांना मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील हा बालविवाह लावण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान, फिर्यादीने सलाबतपूर येथील ग्रामसेवक भाऊसाहेब शेळके यांना वेळोवेळी समक्ष भेटून सदर अल्पवयीन मुलीचा जन्मदाखला, आधार कार्ड असे कागदपत्रांचे पुरावे गोळा करून व पूर्ण चौकशी केली असता या मुलीचे वय 16 वर्षे सोळा दिवस असे आढळले. यावरून पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 114558

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *