म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामाला अजूनही सापडेना मुहूर्त परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याने आंदोलनाचा इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल पडून वर्ष लोटले तरी अजूनही कामास सुरुवात झाली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या पुढार्यांना अन् पालिकेला जागे करण्यासाठी ‘सौ शहरी एक संगमनेरी’ नुसार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर पूल पडून वर्ष होत आले आहे. याबाबत आवाज उठविल्यानंतर केवळ तात्पुरती दुरुस्ती केली. आता पावसाळा सुरू झाला आहे, शिवाय शाळा व महाविद्यालये देखील सुरू झालेली आहेत. या रस्त्यावरुन मोठ्या संख्येने नागरिकांसह विद्यार्थ्यांची नियमित ये-जा असते. त्यामुळे रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यारंभ आदेश निघूनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संतापाची भावना आहे.
सदर पुलावरुन नेहमीच रहदारी सुरू असते. त्यातही शाळा व महाविद्यालये सुरू झालेले असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची ये-जा करताना मोठी कसरत होत आहे. यातूनच पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच पुलाचे कामही वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने वेळप्रसंगी नगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा कैलास वाकचौरे, अल्पना तांबे, अविनाश थोरात आदिंसह नागरिकांनी दिला आहे.