संगमनेरमधील सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करा ः जाखडी बंद सीसीटीव्हींमुळे गुन्हेगारीसह छेडछाडीचे प्रकार वाढले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरामध्ये काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले बहुसंख्य सीसीटीव्ही तांत्रिकदृष्ट्या दुर्लक्ष केले गेल्यामुळे बंद पडलेले आहेत. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच सीसीटीव्ही चालू आहेत. बंद पडलेल्या सीसीटीव्हींमुळे संगमनेर शहरात गुन्हेगारी आणि छेडछाडीचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून संगमनेर शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते, मोक्याची ठिकाणे, वर्दळीची ठिकाणे संभाव्य गुन्हेगारीची ठिकाणे महाविद्यालयांचे आणि शाळांचे परिसर संवेदनशील चौक अशा सर्व ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही बसवून पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणी पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख माननीय राकेश ओला यांना पाठविले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की ‘संगमनेरमध्ये वाढती गुन्हेगारी हा शांतताप्रिय नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून नेणारे चोर भामटे, बँका जवळून रोकड रक्कम लाबवणारे चोरटे, घर फोड्या करणारे भुरटे चोर, शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागात दरोडे टाकणारे दरोडेखोर, शाळांपाशी उभे राहणारे रोडरोमिओ यांच्याकडून विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, धक्काबुक्की, अश्लील इशारे, त्याचप्रमाणे महाविद्यालयांजवळ सातत्याने जीव मुठीत धरून तरुणींना वावरावे लागणे ही संगमनेरच्या दृष्टीने मुळीच भूषणाची गोष्ट नाही. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगार पकडून त्यांची पोलीस खात्याने धिंड काढावी; म्हणजे शांतताप्रिय कायदाप्रेमी जनतेला ज्येष्ठ नागरिकांना, माता भगिनींना, विद्यार्थिनींना, युवतींना दिलासा मिळेल.
सध्या तरी पोलिसांकडून सीसीटीव्हींबाबत कोणतेही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे पुरोहित प्रतिष्ठानला याबाबत आवाज उठवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे. आम्ही केवळ आवाज उठवत नाही तर काही सीसीटीव्ही आम्ही पुरोहित प्रतिष्ठानच्या निधीमधून समाजासाठी लोकार्पण करण्यास तयार आहोत, असेही जाखडी यांनी पत्रकात म्हटले आहे.
संगमनेरमध्ये प्रचंड मोठा गाजावाजा होऊन तब्बल ५५ सीसीटीव्ही लावण्यात आले होते, त्यांचे काय झाले हे गौडबंगाल गुलदस्त्यातच आहे. आता खरोखर शहराचा प्रचंड विस्तार वाढल्यामुळे आणि शहरात परप्रांतीय नागरिकांचा वावर वाढल्याने सीसीटीव्हींची नितांत आवश्यकता आहे. संगमनेरकरांना निर्भयपणे आयुष्य जगता यावे ही पुरोहित संघाची भूमिका असून त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांचे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पुरोहित प्रतिष्ठानने केला आहे.