मुलाच्या साथीने आईने केली यशस्वी शेती! सावरगाव पाटच्या नेहे कुटुंबाचा तरुणांसाठी आदर्श

नायक वृत्तसेवा, अकोले
आपला देश कृषिप्रधान मानला जातो. कृषी क्षेत्राला एका ठराविक उंचीपर्यंत नेण्यासाठी देशातील महिलांचा खूप मोठा वाटा आहे. शेतामध्ये राबणारे बहुसंख्य हात हे महिलांचे आहेत हे त्रिवार सत्य आहे. सावरगाव पाट (ता.अकोले) येथील छबुबाई बालचंद नेहे यांनी आपला पती आणि मोठा मुलगा अकाली गमावल्यानंतरही शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून कुटुंबाला सावरण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

कुटुंबात आणि परिसरात ‘बाई’ नावाने त्यांना ओळखले जाते. या माऊलीने अपार कष्ट करत आपल्या कुटुंबाला तर सावरले परंतु परिसराला शेती तंत्रज्ञानाची विशेष जाणीव करून दिली. त्यांचा मुलगा संदीप हा अत्यंत कष्टाळू आहे. त्याची ओळख मातीशी एकनिष्ठ असलेला शेतकरी म्हणून आहे. वडिलांना आणि मोठ्या भावाला गमावल्यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आईसोबत संदीपवर आली. आणि तेथूनच सुरुवात झाली ती संघर्षपूर्ण जीवनाला. ही जबाबदारी त्या दोघांनीही काबाडकष्ट उठून पेलून दाखवली. शेती सुद्धा उद्योग होऊ शकतो हे त्यांनी जगाला पटवून दिले. अतिशय नम्र आणि शांत सुस्वभावी असलेला संदीप आज सर्व तरुण वर्गाला आदर्श ठरला आहे. एका खासगी कंपनीत नोकरीला असलेला संदीप कुटुंबावर ओढवलेल्या संकटामुळे कायमस्वरूपी आपल्या गावी सावरगाव पाट याठिकाणी स्थायिक झाला. किंबहुना तसे करणे त्याला परिस्थितीने भाग पाडले होते. परंतु या सर्व बाबींचा बाऊ करून न घेता त्याने अत्यंत चिकाटीने आपल्या आईसोबत शेती व्यवसाय वृद्धिंगत करायला घेतला आणि तो त्यात यशस्वीही ठरला. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती बागायती करण्यासाठी संदीपला व आई छबुबाई यांना अत्यंत काबाडकष्ट करावे लागले. परंतु त्याची चिंता न करता त्यांनी गावाजवळून गेलेल्या आढळा नदीवरून आपल्या शेतासाठी पाईपलाइनने पाणी आणले.

डोंगराळ, मुरमाड असलेल्या जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवले. फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, चारा पिके, दूध व्यवसाय यामध्ये या कुटुंबाने मोठी भरारी घेतली आहे. स्वखर्चाने व काही प्रमाणात बँकेच्या मदतीने गावातील पहिले पॉलिहाऊस संदीपने उभारले आहे. पॉलिहाऊसमध्ये उच्चप्रतीची फुलशेती आणि भाजीपाला शेती त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. सध्या त्यांच्या शेतामध्ये शेवंती या फुलांची काढणी सुरू आहे. एकल पीक पद्धतीच्या मागे न जाता विविध पीक पद्धतीचा अवलंब करून त्याने शेती व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. आत्तापर्यंत शेतामध्ये लाखो रुपये गुंतवणूक करणारा संदीप पाण्याच्या शाश्वतीसाठी खूप धडपड करताना दिसला आहे. आपल्या शेतावरच सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव त्याने बांधला आहे. त्यातून शेतीसाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता आता होत आहे. पूर्वीपासूनच दूध व्यवसायाची आवड असलेला संदीप डेअरी डिप्लोमा करून दूध व्यवसायातही यशस्वी ठरला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता संदीप आणि बाईने उभा केलेला प्रपंच खूप आदर्श आहे.

संकटातून उठून नवीन भरारी घेण्याचा आदर्श संदीप नेहे याच्याकडून घ्यायला हवा. आज अनेक तरुण नोकरी नाही म्हणून गावात पारावर बसून टिंगल टवाळी करत दिवस घालवतात. त्यांनी एकदा संदीपच्या व बाईच्या शेताला नक्की भेट द्या. संकटावर मात करत जीवन समृद्ध करणे म्हणजे काय याचे नक्की उत्तर मिळेल. बाईच्या आणि संदीपच्या कष्टाला सलाम.

Visits: 16 Today: 1 Total: 114933

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *