आंबीदुमालामध्ये बिबट्याचा तरुणावर हल्ला

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात संदेश बाळासाहेब नरवडे हा तरूण जखमी झाला आहे. सदर घटना नुकतीच घडली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला आहे.

आंबीदुमाला गावांतर्गत असलेल्या उंबरी येथील बाळासाहेब नरवडे या शेतकर्‍याचा मुलगा संदेश हा बुधवारी सकाळी महाविद्यालयाला जाण्यासाठी घरून निघाला होता. त्या दरम्यान तो घरापासून काही अंतरावर आला असता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने संदेशवर पाठीमागून हल्ला करत पायावर पंजा मारला. त्यामुळे त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने लगेच धूम ठोकली. संदेशचे वडील बाळासाहेब नरवडे यांनीही तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि जखमी संदेशला उपचारार्थ बोटा ग्रामीण रुग्णालयात आणले. हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावला आहे. यापूर्वीही बिबट्याने याच परिसरात एका शेतकर्‍यावर हल्ला करत जखमी केले होते.

Visits: 105 Today: 1 Total: 1113471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *