शहरी व ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट; सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास संगमनेर शहरातील मदिनानगरमध्ये बंगला फोडला तर माळेगाव हवेलीमध्ये घर फोडले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरालगत असणारा कोल्हेवाडी रस्ता आणि जोर्वे रस्त्यावरील निंबाळे परिसरात चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला असला तरी शहरातील मदिनानगरमधील बंगला फोडून कपाटातील 35 हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे 15 हजार रुपये किंमतीचे दागिने असा सुमारे 63 हजारांचा मुद्देमाल मात्र लांबविण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. तर दुसर्या घटनेत तालुक्यातील माळेगाव हवेली येथे घरफोडी करुन कपाटातील 48 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख असा सुमारे 58 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील मदिना नगर परिसरातील अब्दुल सत्तार अब्दुल करीम शेख यांच्या मालकीचा बंगला चोरट्यांनी फोडून उचकपाचक करत कपाटातील 35 हजार रुपये रोख रक्कम आणि शेख यांच्या पत्नीच्या कानातील 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे डुल, मुरणी आणि 3 हजार रुपये किंमतीचे पैंजण असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. याबाबत अब्दुल शेख यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत तालुक्यातील माळेगाव हवेली येथील दादा गिरजू शिंदे यांचे घर चोरट्यांनी फोडून कपाटात ठेवलेले 48 हजार रुपये किंमतीचे 4 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत दादा शिंदे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोल्हेवाडी रस्ता परिसरातील बाहेर गावी गेलेली व्यक्ती सोमवारी मध्यरात्री आली असता त्या व्यक्तीस चोरटे दिसताच त्याने आरडाओरडा करून अरे दरोडेखोर आले, धरा-धरा, धावा-धावा, पकडा-पकडा असा एकच कल्लोळ केला. त्यामुळे चोरट्यांनी जीवाच्या आकांताने जिकडे दिशा मिळेल त्या दिशेने पळ काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा निंबाळे परिसरातील नीलेश पर्बत यांच्या घराकडे वळविला. मात्र परिसरातील नागरिक वेळीच सावध झाले होते. नागरिकांनी एकत्रित येऊन हातात काठ्या-कुर्हाडी घेऊन त्या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र एकही चोरटा दुर्दैवाने त्या नागरिकांच्या हाती लागला नाही. तर सुदैवाने कोणाला काहीही झाले नाही. मात्र त्यादिवशी परिसरातील नागरिकांना जागता पहारा द्यावा लागला. या प्रकरणाची नागरिकांनी तात्काळ शहर पोलीसांना माहिती दिली. मात्र, बर्याच वेळेनंतर पाच-सहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. परंतु, तुम्ही निंबाळे गाव व परिसरात गस्त वाढवा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.