संगमनेर तालुक्याचा प्रवास सहा हजार ओलांडण्याच्या दिशेने! आज शहरातील बारा जणांसह बत्तीस जणांना झाली कोविडची लागण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशात एकीकडे लसीकरणाच्या नियोजनात्मक चर्चा सुरु असताना, दुसरीकडे ब्रिटनमधून कोविडचा नवा स्टेन समोर आल्याने संपूर्ण जग पुन्हा एकदा हादरले आहे. मात्र त्याचवेळी सध्या येवू घातलेली लस टोचल्यानंतर हा विषाणू देखील निष्प्रभ ठरात असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगीतले जात असल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. देशात तयार झालेली लस आपल्यापर्यंत येण्यास अजून बराच अवकाश आहे, मात्र तोपर्यंत कोविडच्या प्रादुर्भावात कोणताही खंड पडला नसून आजही शहरातील बारा जणांसह 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडून ती आता 5 हजार 847 वर पोहोचली आहे.
चालू महिन्यात सुरुवातीला वेगाने होणार्या रुग्णवाढीत गेल्या काही दिवसांपासून घट झाली असून दररोजची सरासरीही खाली आली आहे. त्यातच सध्याचा कोविड विषाणू काहीसा सौम्य झाल्याचेही दिसत असल्याने मृत्यूदरही खालावला आहे. मात्र त्याचा धोका आजही कायम असून आपले थोडेसे दुर्लक्षही आपल्याला बाधित करु शकते. त्यामुळे ‘जबतक दवाई नहीं, तबतक ढिलाई नहीं’ या सूत्राचे प्रत्येक नागरिकाला पाल करावे लागणार आहे.
आज खासगी प्रयोगशाळेकडून 14, शासकीय प्रयोगशाळेकडून दोन तर रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील 11 जणांचा समावेश असून शहरातील कुंभार आळा परिसरातील 78, 56 व 55 वर्षीय महिलेसह 59 व 57 वर्षीय इसम, विद्यानगर परिसरातील 30 वर्षीय तरुण, गणेश नगर परिसरातील 62 वर्षीय नागरिकासह 48 व 42 वर्षीय महिला, घोडेकर मळा परिसरातील 61 व 50 वर्षीय महिला, गजबजलेल्या साईनाथ चौक परिसरातील 52 वर्षीय इसम बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील शिबलापूर येथील 13 वर्षीय मुलगी, चंदनापुरी येथील बारा वर्षीय मुलगी, निमगाव जाळी येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचपूर येथील 50 वर्षीय महिला.
गुंजाळवाडी शिवारातील बटवाल मळा येथील 40 वर्षीय तरुणासह 38 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 67 वर्षीय महिला, कनोली येथील 47 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील एकूण 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जवळेकडलग येथील 70 वर्षीय महिला, खळी पिंपरी येथील 31 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, काकडवाडी येथील 46 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 39 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 58 वर्षीय इसम, अंभोरे येथील 52 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 52 वर्षीय इसम, आश्वी येथील 57 वर्षीय इसम, निमोण येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व मालदाड येथील 27 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आजच्या रुग्णसंख्येने तालुक्याची बाधित संख्या 5 हजार 847 वर पोहोचली आहे.
जिल्हा यंत्रणा व स्थानिक यंत्रणेतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा सिद्ध..!
जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु पासून स्थानिक पातळीवर काम करणारी यंत्रणा आणि जिल्हा पातळीवरील यंत्रणा यांच्यात वारंवार समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला जिल्हा यंत्रणेकडून खासगी प्रयोगशाळांच्या अहवालातून बाधित झालेल्या रुग्णांची संख्याच दर्शविली जात नव्हती. त्यानंतर अधुनमधून कधीतरी ती एकाचवेळी दर्शविली जावू लागल्याने तालुका पातळीवरुन मिळणारी रुग्णसंख्या आणि जिल्हा पातळीवरुन मिळणार्या संख्येत कधीच ताळमेळ जुळला नाही, ती स्थिती आजही कायम आहे. त्यातच आपले नाव खराब होवू नये म्हणून ठिकठिकाणच्या स्थानिक यंत्रणांनी कोविडने झालेले मृत्यू झाकण्याचा प्रयत्न केल्याचे वास्तवही जिल्हा यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून दिसत आहे. स्थानिक यंत्रणेनुसार सोमवारपर्यंत (ता.21) संगमनेर तालुक्यातील एकूण कोविड बाधितांची संख्या 5 हजार 815 इतकी तर मृत्यू झालेल्यांची संख्या 46 आहे. मात्र जिल्हा यंत्रणेच्या अहवालानुसार सोमवारपर्यंत संगमनेरात 6 हजार 53 रुग्ण आढळले असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुनच समन्वयाचा अभाव सहज लक्षात येतो.