कळसूबाई शिखरावर भाविकांची अलोट गर्दी राजूर पोलिसांसह स्वयंसेवकांचा चोख बंदोबस्त
नायक वृत्तसेवा, राजूर
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवानिमित्त पाचव्या माळेला परिसरातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तरुणाईची तर अक्षरशः रांग लागली होती.
आदिवासींचे कुलदैवत असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर विराजमान झालेल्या कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवात परिसरातील भाविकांसह इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे कळसूबाई शिखर गर्दीने फुलून गेले होते. नवरात्र उत्सवात पाचव्या, सातव्या व नवव्या माळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यात सर्वाधिक तरुणांची संख्या असते. दुपारच्या ऊन्हाचा त्रास नको म्हणून भाविक पहाटे लवकरच गड चढण्यास सुरुवात करतात. सुमारे १६४६ मीटर उंच असणार्या शिखरावर पोहचण्यासाठी दरमजल करत दोन ते तीन तास लागतात.
अरुंद पायवाट, अवघड ठिकाणी वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्या, रस्त्यावर काही ठिकाणी छोट-छोट्या स्थानिक व्यावसायिकांनी उभारलेले स्टॉल अशा उत्साही वातावरणात कळसूबाई मातेचा जयघोष करत शिखरावर पोहचल्यावर थकवा निघून जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्याचे समाधान मिळते. या काळात प्रचंड गर्दी होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक स्वयंसेवक आणि राजूर पोलीस ठाण्यांतर्गत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावर्षी देखील सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. दिलीप डगळे, अशोक गाडे, रोहिणी वाडेकर, धराडे, मुठे, गृहरक्षक दलाचे जवान चोख बंदोबस्त बजावत आहे.
कळसूबाई शिखरावर चढताना सुरक्षेचे नियम पाळून भाविकांनी कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करू नये. तसेच कोणत्याही प्रकारे स्टंटबाजी करू नये.
– प्रवीण दातरे (सहायक पोलीस निरीक्षक-राजूर)