कोंढवड पूल दुरुस्तीची क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कोंढवड-तांदूळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे लोखंड अक्षरशः उघडे पडले आहे. यामुळे वाहतुकीसाठी पूल धोकादायक बनला असून, दुरूस्तीसाठी राहुरी येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयास क्रांतीसेनेच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु आजतागायत कार्यालयाकडून कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अखेर अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल करुन लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
कोंढवड-तांदूळवाडी येथील पुलावरून परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. सध्या पुलावरील लोखंड अक्षरशः उघडे पडून मोठे भगदाड पडले आहे. यामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. दुरुस्तीसाठी वेळोवेळी निवेदने देऊनही हा प्रश्न गांभीर्याने न घेता संदर्भानुसार योग्यवेळी कुठलीही ठोस कार्यवाही संबंधित अधिकार्यांनी केली नसल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे या पुलामुळे कुठलीही अप्रिय घटना घडल्यास आणि जीतितहानी झाल्यास संबंधित अधिकार्यांना दोषी ठरवून कारवाई करावी व पुलाच्या दुरुस्तीचा खर्च अधिकार्यांच्या दिरंगाईमुळे वाढणार आहे; त्याचा शासनाच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचा अधिकचा खर्चही या अधिकार्यांकडून वसूल करावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे, शिलेगावचे माजी सरपंच रमेश म्हसे, मच्छिंद्र पेरणे, जगन्नाथ म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, किशोर म्हसे, रत्नकांत म्हसे, दिलीप म्हसे, गणेश गाढे, अमोल माळवदे, भाऊसाहेब पवार, राहुल हिवाळे, महेश ढोकणे आदिंनी केली आहे.