एकादशीला होणारी नेवासा येथील माऊलींची यात्रा रद्द
नायक वृत्तसेवा, नेवासा
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील कार्तिक वद्य एकादशीला लाखांहून अधिक होणारी गर्दी लक्षात घेता शुक्रवारी (ता.11) होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देशमुख महाराजांनी म्हंटले आहे की सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड-19 या विषाणूजन्य रोगाचा फैलाव सुरू असून त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व अहमदनगर जिल्ह्यात देखील सुरू आहे. श्री क्षेत्र नेवासा हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असल्याने कार्तिक वद्य एकादशीला मोठी यात्रा भरत असते. यादिवशी लाखोंच्या संख्येने माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी येथे भाविक येत असतात. मात्र यावर्षी येणार्या कार्तिक वद्य एकादशीला होणार्या गर्दीमुळे मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे शुक्रवारी होणारा यात्रौत्सव शासकीय आदेशाचे पालन म्हणून रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी एकमताने घेतला असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तरी कोणीही तीर्थस्थानावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करु नये, घरीच बसून माऊलींचे ध्यान करावे असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळींनी केले आहे.