अवघ्या पाच दिवसांत एकोणतीस हजार महिलांचा प्रवास! संगमनेर बस आगाराचा विक्रम; महिला सन्मान योजनेला मोठा प्रतिसाद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘नारी तू नारायणी’ असे म्हंटल्या जाणार्या महिलांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महिला सन्मान योजने’ला राज्यासह संगमनेर तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 17 मार्चपासून राज्यात लागू झालेल्या या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच महिलांनाही राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वप्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटांत राज्यात कोठेही प्रवास करता येतो. गेल्या पाच दिवसांत तालुक्यातील 28 हजार 814 महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी असल्याने येणार्या कालावधीत महिला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यताही संगमनेर बस आगाराचे प्रमुख मयूर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वप्रकारच्या बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास भाडे आकारण्याचा निर्णय जाहीर केला होता. आधीच आजारी असलेल्या महामंडळाच्या उत्पन्नाला यामुळे मोठा फटका बसेल असे अपेक्षित असताना त्यांना यापोटी होणारा संपूर्ण खर्च वर्षाकाठी राज्य सरकार परिवहन महामंडळाला देणार असल्याचे सांगत यावरील चर्चाही थांबवल्या होत्या. त्यामुळे विधीमंडळात सदरची योजना जाहीर होताच राज्यातील सर्व आगारांमध्ये तत्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावली सुरू झाली आणि त्याला महिला प्रवाशांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे.
गेल्या 17 मार्चपासून राज्यात लागू झालेल्या या योजनेचा लाभ घेत पहिल्या दिवशी 5 हजार 687 महिलांनी संगमनेर बस आगारातून राज्यात इतरत्र प्रवास केला. त्यानंतरच्या चार दिवसांत साधारणतः याच पटीने दररोज सरासरी 5 हजार 763 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. संगमनेर बसस्थानकातून दररोज विविध अंतर कापणार्या बसेसच्या 320 फेर्या सुरु आहेत. त्यात दीर्घ, मध्यम व ग्रामीण अशा तीनस्तरिय बसेसचा समावेश आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात मुंबई, सातारा, कोल्हापूर, गोंदवले, पंढरपूर, सोलापूर, सांगली, मध्यम पल्ल्याच्या प्रवासात छत्रपती संभाजी महाराज नगर, पुणे, नाशिक, बारामती, बीड, अहमदनगर यासारख्या शहरांचा तर ग्रामीण फेर्यांमध्ये संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध गावांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना विविध तीस प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकीटांची योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना परिवहन महामंडळाने वयोवृद्ध नागरिकांसाठी (75 वर्षांपुढील) मोफत बस प्रवासाची घोषणा केली होती, त्यालाही राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना आता त्यात महिला सन्मान योजनेचाही समावेश झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस हाऊसफुल्ल होवून धावू लागल्या आहेत.
गेल्या पाच दिवसांत ‘महिला सन्मान योजनेतंर्गत’ एकूण 28 हजार 814 महिलांनी अर्ध्या तिकिटांत प्रवास योजनेचा लाभ घेतला आहे. सध्याचा कालावधी परीक्षांचा आहे. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांची गर्दी नियमित आहे. मात्र परीक्षांचा काळ संपल्यानंतर प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढेल असा आमचा अंदाज असून त्यात महिलांची संख्या लक्षणीय असेल. प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध असून महिला सन्मान योजनेला मिळालेला प्रतिसाद बघता आगारातील सर्व कर्मचार्यांचा उत्साह दुणावला आहे.
– मयूर पाटील
संगमनेर बस आगार व्यवस्थापक