उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू! अत्यावश्यक सेवांसाठीही जिल्हाधिकार्यांनी केली कालमर्यादा निश्चित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संध्याकाळी जिल्ह्यात चौदा दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याच वेळी उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी फेरआदेश काढतील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री बारा वाजेपासून 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील संक्रमनात दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच उपचारांची आवश्यकता असलेल्या गंभीर रुग्णांची संख्याही दररोज वाढत असल्याने जिल्ह्यात रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन व रेमडेसिवीर लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकही सैरभैर झाल्याचे दृष्य संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहे. रोजच्या उच्चांकी रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांंवरील ताण वाढला असून रुग्णांना खाटा मिळेनाशा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी व श्रीरामपूर येथे आढावा बैठका घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर अहमदनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोविडची साखळी तोडण्यासाठी व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी कडकडीत जनता कर्फ्यू लोकांनीच स्वयंस्फुर्तीने पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी फेरआदेश काढतील असे संकेतही त्यांनी दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले असून या आदेशान्वये आज मध्यरात्री बारा वाजेपासून ते 1 मे रोजी च्या सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी कायम राहणार असून या दरम्यानच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांंनाही काल मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून आता रस्त्यावर भाजीपाला व फळे मिळणार नाहीत. त्यासाठी केवळ घरोघरी जाऊन भाजी विक्री करणाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर अन्य सर्वच अत्यावश्यक सेवांसाठी कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बियर बार बंद राहतील. मात्र त्यांना घरपोहोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, भाजीपाल्याचे बाजार व दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील. टॅक्सी, रिक्षा या द्वारे फक्त अत्यावश्यक सेवांं करिता वाहतूक करता येईल. चारचाकी खासगी वाहने फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वापरता येतील. सर्व खासगी कार्यालय पूर्णतः बंद राहतील. यापूर्वी पंचवीस लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली होती, मात्र नवीन आदेशानुसार 1 मे पर्यंत कोणत्याही लग्न सोहळ्याला परवानगी मिळणार नाही. यासोबतच चहाची दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित सर्व प्रकारची दुकाने, सर्व प्रकारचे कार्यक्रम, सर्व प्रकारची खासगी बांधकामे, सेतू कार्यालय, आधार कार्यालय, व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, मॉर्निंग वॉक करण्याची ठिकाणे, तसेच बेकरी व मिठाईची दुकाने पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यासोबतच अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या किराणा दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मटन, चिकन व मासे, कृषी संबंधित सर्व सेवा व दुकाने, पशुखाद्य विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल या गोष्टी केवळ सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 11 वाजे नंतर यापैकी कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत. याशिवाय भाजीपाला व फळे घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. एका जागेवर बसून या गोष्टींची विक्री करण्यास पूर्णता मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सेवेतील वाहने व मालवाहतूक करणारी खासगी वाहने यांना मात्र नियमित वेळेनुसार फक्त डिझेल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज मध्यरात्री बारा वाजेपासून सदरचे आदेश संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात लागू होणार आहेत. या आदेशाचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Visits: 153 Today: 2 Total: 1121033
