संगमनेरसह नगरमधून दुचाकी चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सात दुचाकी केल्या हस्तगत


नायक वृत्तसेवा, नगर
नगर, संगमनेरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळेफाटा येथून दुचाकींची चोरी करून त्याची विक्री करणार्‍या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत गजाआड केले. राहुल विजय निकम (वय २४, रा. विळदघाट, ता. नगर), बंडू सुदाम बर्डे (वय २९, रा. देहरे, ता. नगर) व अरूण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ३० हजाराच्या सात महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांबाबत तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, भीमराज खर्से, फुरकान शेख, सागर ससाणे, रणजीत जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांचे पथक स्थापन करण्यात आले.

सदरचे पथक नगर शहर परिसरात फिरून दुचाकी चोरी करणार्‍यांची माहिती घेत असताना निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की, राहुल निकम हा साथीदारासह देहरे येथून विळद घाट बाह्यवळण येथे चोरी केलेली विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्याकरीता येणार आहे. निरीक्षक आहेर यांनी पथकाला सूचना देऊन त्याला पकडण्यास सांगितले. पथकाने सदर ठिकाणाहून दोन संशयित व्यक्तींना बिना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडले. त्यांनी दूध डेअरी चौक एमआयडीसी येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार अरूण बाळासाहेब धिरोडे याच्यासोबत नगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक येथून चार व पुणे जिल्ह्यातील शिरूर व आळेफाटा येथून तीन अशा सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी धिरोडे यालाही ताब्यात घेत अटक केली. त्या तिघांकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तिघांना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Visits: 418 Today: 1 Total: 1103278

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *