शिक्षकांना पाठ्यक्रमाची साथ मिळाल्यास राष्ट्र बांधणी होईल ः डॉ.कळमकर
शिक्षकांना पाठ्यक्रमाची साथ मिळाल्यास राष्ट्र बांधणी होईल ः डॉ.कळमकर
एकतीस शिक्षकांना रोटरी राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार प्रदान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सद्यस्थितीत काळ ज्या वेगाने बदलतो आहे त्या पद्धतीने दुर्दैवाने अभ्यासक्रम बदलत नाही. बदलत्या काळाचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात उमटत नाही. सामाजिक व राजकीय नागरिकशास्त्र वेगाने धावत असताना पुस्तकातील नागरिकशास्त्राला मात्र साचलेपण आले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचे व काळाचे वास्तव मुलांना समजण्यासाठी अभ्यासक्रम बदलला पाहिजे. प्रामाणिक काम करणार्या शिक्षकांना पाठ्यक्रमाची साथ मिळाल्यास खर्या अर्थाने राष्ट्र बांधणी होईल, आणि राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार त्यासाठी दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक डॉ.संजय कळमकर यांनी केले.
संगमनेर येथील रोटरी क्लब तर्फे रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार तालुक्यातील 31 शिक्षकांना प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे (मुंबई), सचिव योगेश गाडे, प्रकल्प प्रमुख सुनील घुले, प्रा.शरद तुपविहिरे उपस्थित होते. ‘सावित्रीच्या लेकी’ या नियतकालिकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. संपादक मंडळ सदस्या वृषाली कडलग यावेळी उपस्थित होत्या. रोटरी आय केअर ट्रस्टच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्या स्व.मधशिेंठ गाडे यांनाही याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली.
आपल्या भाषणात डॉ.कळमकर पुढे म्हणाले, शिक्षकांचा सन्मान केला तरच समाज टिकेल. कोणीही शिक्षकांचा पगार काढतो. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या शिक्षकांचे विकृत चित्रण प्रसारमाध्यमांवर रंगवले जाते हे चुकीचे आहे. उपेक्षीत, गरीब, ग्रामीण मुलांची आई होऊन काम करणार्या शिक्षकांना समाजाने सन्मान दिलाच पाहिजे. आपल्यालाही कोणी तरी गुरुजींनी शिकवले म्हणूनच आपण घडलो याचे भान समाजघटकांनी ठेवले पाहिजे. शिक्षकाला उत्पादक उत्पादित घटक समजले जात नाही. परंतु सर्व उत्पादित घटकांमध्ये उत्पादन क्षमता कौशल्य निर्माण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात.
याप्रसंगी सुवर्णा फटांगरे, स्वाती कहार, बाजीराव गायकवाड, रमेश डोंगरे, नीलेश वाकचौरे, प्राजक्ता शेळके, अनिल कवडे, पाराजी सोनवणे, सचिन माधव अंकाराम, रूपाली देशमुख, संजय केदारी, मुक्ता गाडेकर, सीताराम औटी, संजय शेंडगे, भाग्यश्री बडदे, वैशाली कदम, महेंद्र रहाणे, पांडुरंग वाळुंज, भास्कर बगाड, सुवर्णा ढोकरे, दीपाली पवार, निवृत्ती घोडे, जयश्री ठोंबरे, भाऊसाहेब ढोकरे, माधुरी जाधव, ज्योती घोडे, सुनंदा खताळ, सोमेश्वर जेडगुले, प्रभाकर रोकडे, भारत काळे, शिवनाथ पारधी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईचे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे म्हणाले, शिक्षणाचे सौंदर्य शिक्षकांमध्ये आहे. शिक्षकांचे सौंदर्य चारित्र्यामध्ये आहे व चारित्र्याचे सौंदर्य संस्कृतीमध्ये आहे. शिक्षक ही राष्ट्राची बौद्धिक संपत्ती आहे. त्यांना या पुरस्काराने प्रतिष्ठा दिली आहे. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी लवकरच रोटरी क्लब तालुक्यातील 17 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी 39 लाख खर्चाचा रोटरी ई-लर्निंग डिजिटल टॅब प्रकल्प राबवणार असल्याचे सांगितले. 300 टॅब असलेल्या या प्रकल्पाचे 900 विद्यार्थी लाभार्थी ठरतील असेही ते म्हणाले.