नायक वृत्तसेवा, अकोले 
योग हा केवळ तंदुरुस्तीचा मार्ग नाही तर निरोगी मन आणि आत्मा मिळवण्याचा एक मार्ग आहे.भारतातील एक प्राचीन आणि पारंपारिक पद्धत आहे. भारत देश हा योग आणि ध्यानाचे जन्मस्थान देखील आहे. म्हणून मन आणि शरीराच्या पलीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जीवन पाहण्यास मदत करण्यासाठी योगाभ्यास जीवनामध्ये फार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी केले.
येथील अभिनव शिक्षण  संकुलात योग प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला यावेळी नवले बोलत होते. संस्थेच्या अभिनव कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात योगशिक्षण पदविका अभ्यासक्रमास  यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाने मान्यता दिली आहे.
हा शिक्षणक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झाला असून या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. यासाठी कुठल्याही शाखेतील बारावी पास,  तथा दहावीनंतरचा दोन वर्षाचा अधिकृत डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्याचप्रमाणे योग शिक्षणाची आवड असणारे शिक्षक, शासकीय निमशासकीय कर्मचारी, गृहिणी देखील प्रवेश घेऊ शकतात. या प्रवेशासाठी वयाची अट नाही. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा कॅम्पस  डायरेक्टर प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख, सचिव विक्रम नवले, प्राचार्य अल्फोंसा डी,अभिनव कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या कुसुम वाकचौरे, केंद्र संयोजक प्रा. सुरेश मेंगाळ यांनी या शिक्षण क्रमाबद्दल माहिती दिली.
या शिक्षण क्रमाचे माध्यम मराठी असून योग सिद्धांत, शरीर शास्त्र, शिक्षण शास्त्र ,योगाभ्यास, भारतीय आहारशास्त्र या विषयांचा यात समावेश आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देखील हा शिक्षणक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.एकाच वेळेस आपण दोन डिग्री कोर्स पूर्ण करू शकतो.हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.