जायकवाडी धरणात अंदाजे 141 टीएमसी इतक्या पाण्याची नव्याने आवक ः चकोर
जायकवाडी धरणात अंदाजे 141 टीएमसी इतक्या पाण्याची नव्याने आवक ः चकोर
मुख्य धरण समूहांतून अंदाजे 30 टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठवाड्यासाठी संजीवनी असलेले जायकवाडी धरण यावर्षी सप्टेंबरमध्येच पूर्ण क्षमतेने 102.73 टीएमसी इतके भरले असून यावर्षी जायकवाडी धरणात एकूण अंदाजे 141 टीएमसी इतक्या पाण्याची नव्याने आवक झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली असल्याचे जल व सिंचन अभ्यासक निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले आहे.

याविषयी अधिक बोलताना चकोर यांनी नमूद केले की, विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी समूहामधील नद्यांच्या व अहमदनगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरा नद्यांच्या उगमस्थानी घाटमाथ्यावर काहीसा कमी प्रमाणात पाऊस होऊन देखील मुळा-प्रवरा नदीसमूहांतील मोठी, मध्यम, लघू पाझर तलाव व पाणीसाठा बंधार्यांच्या माध्यमातून अंदाजे साठवण्यात येणारे 52 टीएमसी इतके पाणी उपलब्ध होऊन म्हणजेच भंडारदरा, निळवंडे व मुळा ही महत्त्वाची धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरून प्रवरा नदीतून ओझर (ता.संगमनेर) बंधार्यावरून सुमारे 13.50 टीएमसी व मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सुमारे सोळा 16.00 टीएमसी इतके पाणी मिळून मुख्य धरण समूहांतून म्हणजेच एकूण एकत्रित अंदाजे 30 टीएमसी इतके पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. त्याचप्रमाणे मुळा व प्रवरा नद्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीला ज्याठिकाणी मिळतात, त्या मधमेश्वर (ता.नेवासा) येथील बंधार्यावरून यावर्षी सुमारे (30+12=42) टीएमसी इतके पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यातील फक्त गोदावरी धरण समूहांतील धरणांमधून सर्व प्रकारचे फक्त मोठे व मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता सुमारे पंचावन्न 55 टीएमसी पूर्ण क्षमतेने भरून नांदूर मधमेश्वर बंधार्यावरून गोदावरी नदीत सुमारे साडेछत्तीस 36.50 टीएमसी इतके पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले, म्हणजेच नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समूहांमधून अंदाजे एकूण एकत्रित सुमारे 67 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे. परिणामतः जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरण समूहांमधून सोडलेल्या सुमार े(36.50+30.00 = 66.50) टीएमसी पाण्याव्यतिरिक्त अंदाजे 75 टीएमसी इतक्या पाण्याची आवक जायकवाडी धरणाच्या (फ्री कॅचमेंट एरिया) मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये यावर्षी पडलेल्या उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे नव्याने झाली.

यावर्षी जायकवाडीच्या धरणाच्या फ्री कॅचमेंट एरियामध्ये जवळपास गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट जादा पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली पाणी आवक इत्यादीमुळे जायकवाडी धरणामध्ये यावर्षी समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसार नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी धरण समूहांचे व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज भासली नाही हा अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तरीही सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणार्या अति पर्जन्यवृष्टीमुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी नदी खोर्यात वळविणे अत्यंत गरजेचे आहे. या विषयावर अनेक राजकीय नेते, समाजधुरीण व जलतज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून वारंवार शासनाकडे मागणी केली आहे. मात्र याविषयी शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. याबाबत चर्चा, भाषणे केली जातात मात्र प्रत्याक्षात कार्यवाही ठप्प आहे. सुदैवाने यावर्षी जायकवाडी धरणाचे पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असल्याने यावर्षी थोडीशी उसंत मिळाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे चेरापुंजी समजल्या जाणार्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरात गेल्यावर्षीच्या पडलेल्या पर्जन्यवृष्टीपेक्षा सुमारे सरासरी एक हजार (1000) मिलीमीटर इतका पाऊस कमी होऊन देखील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. जायकवाडी धरणस्थळी देखील यावर्षी नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजेच 1087 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला 9 जून,2020 रोजी जायकवाडी धरणात एकूण अंदाजे 53 टीएमसी इतके पाणी शिल्लक राहिलेले होते. यावर्षी पाणलोट क्षेत्र/फ्री कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे झालेली पाणी आवक, नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहांतून ओव्हर फ्लोचे सोडलेले पाणी व गतवर्षीचा शिल्लक पाणीसाठा इत्यादीमुळे जायकवाडी धरणाच्या गेटमधून आजपावेतो गोदावरी नदीत सुमारे 85.50 टीएमसी इतके पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील गोदावरी नदीवरील सर्व धरणे पूर्ण/बंधारे क्षमतेने भरून यावर्षी रब्बी व उन्हाळी हंगामात निश्चितच जास्तीत जास्त क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे मराठवाड्यातील शेती, औद्योगिक क्षेत्रास व पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असल्याने ही मोठी समाधानाची बाब मानली जात आहे.

