तालुक्यातील कोविड संक्रमणाच्या गतीला सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक..! कोविडने घेतले आणखी दोघांचे बळी, शासकीय मृतांचा आकडा झाला 43
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी अवघ्या सात रुग्णांसह तालुक्याने बाधितांचे 45 वे शतक ओलांडल्यानंतर आज त्यात पुन्हा नऊ रुग्णांची भर पडली आहे. आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील केवळ एकासह ग्रामीण भागातील आठ जणांना संक्रमण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या आता 4 हजार 514 वर पोहोचली आहे. त्यासोबतच आज शहरातील एकासह दोघांचा बळीही गेला असून मृतांचा आकडाही आता 43 वर पोहोचला आहे.
गणेशोत्सवात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते संपूर्ण सप्टेंबरमध्ये तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती वाढली होती. मात्र ऑक्टोबरने काहीसा दिलासा दिल्यानंतर परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागल्याने तालुक्यातील संक्रमणात पुन्हा काहीशी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात एकूण संक्रमणाची गती काहीशी मंदावली आहे. अर्थात रविवारी रॅपिड अँटीजेन चाचण्या झाल्या नाहीत, तर कालच्या रविवारमूळे आज शासकीय व खासगी प्रयोगशाळांचे अहवाल अप्राप्त असल्याने संक्रमणात झालेली घट तात्पुरती ठरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या नऊ दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्येत तब्बल 224 बाधितांची नव्याने भर पडली आहे. यात शहरातील 45 तर ग्रामीणभागातील 168 जणांचा समावेश आहे.
आज केवळ रॅपिड अँटीजेन चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातून शहरातील एकासह एकूण नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सलग दोन दिवस रुग्ण संख्येत घट झाल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही आज एकाच दिवशी शहरातील विद्यानगर परिसरात राहणाऱ्या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह शेडगाव येथील 65 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विद्यानगर परिसरातील इसम जिल्हा रुग्णालयात गेल्या 1 नोव्हेंबरपासून उपचार घेत होते, तर शेडगाव येथील व्यक्ती गेल्या 29 ऑक्टोबर रोजी बाधित असल्याचे समोर आले होते. आज एकाच दिवशी दोघाचा मृत्यू झाल्याने दिवाळी सणाच्या काही दिवस आधी संगमनेर तालुक्यात शोक निर्माण झाला आहे.
तर आज बाधित आढळलेल्यांंमध्ये संगमनेर शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या 38 वर्षीय तरुणाला संक्रमण झाले आहे. त्यासोबतच तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील 48 वर्षीय इसम, आश्वी खुर्द येथील 40 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 65 व 62 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 39 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 55 वर्षीय इसम, साकूर येथील 30 वर्षीय महिला व हिवरगाव पठार येथील 33 वर्षीय तरुणाला बाधा झाल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज नऊ जणांची भर पडल्याने तालुका आता 4 हजार 514 वर पोहोचला आहे. तर मृतांच्या संख्येतही आज दोघांची वाढ होऊन एकूण संख्या 43 झाली आहे.
शनिवारी (ता.7) आढळले 24 रुग्ण..
गेल्या शनिवारी शहरातील आठ जणांसह तालुक्यातील रुग्णसंख्येत 24 जणांची भर पडली त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या शनिवारी 4 हजार 498 वर पोहोचली होती. शनिवारी सापडलेल्या बाधितांमध्ये शहरातील माळीवाडा परिसरातील 48, 33 व 25 वर्षीय महिलांसह 31 वर्षीय तरुण, साईबन कॉलनीतील 55 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरुण, विद्यानगर परिसरातील 47 वर्षीय इसम व भारतनगरमधील 36 वर्षीय महिला संक्रमित झाली होती.
त्यासोबतच तालुक्यातील घुलेवाडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिवारातील मालपाणी नगर येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला, येलखोपवाडीतील 35 वर्षीय तरुण, कुरकूंडीतील 52 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 34 वर्षीय तरुणासह दोन वर्षीय बालक, राजापूर येथील 38 व 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 42 वर्षीय तरुण, धानोरी येथील 45 वर्षीय इसम, कनोली येथील 57 वर्षीय महिला, खळी येथील 58 वर्षीय इसम, पेमगिरी येथील 41 वर्षीय तरुण व चिंचोली गुरव येथील 48 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला संक्रमित झाली होती.
रविवारी आढळले केवळ सातच रुग्ण..
तर रविवारी (ता.8) शहरातील तिघांसह एकूण सात रुग्ण समोर आल्याने कालच तालुक्याने बाधितांचे 45 वे शतक ओलांडून 4 हजार 505 रुग्णसंख्या गाठली होती. काल शासकीय प्रयोगशाळेकडून दोन तर खासगी प्रयोग शाळेकडून पाच जणांचे अहवाल प्राप्त झाले. रविवारी रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या गेल्या नाहीत, त्यामुळे सलग रुग्णवाढीचा धक्का बसणार्या संगमनेर तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला होता.
रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील हंगरगेकर रुग्णालयाजवळील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगरमधील 59 वर्षीय महिला व गणेश उद्यानाजवळील 69 वर्षीय महिला तर ग्रामीण भागातील कनोली येथील 36 वर्षीय महिलेसह 34 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 30 वर्षीय तरुण व चंदनापूरी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोविडची लागण झाल्याचे समोर आले होते.
संगमनेर तालुक्यातील शहरासह 156 गावांमधील 4 हजार 514 नागरिकांना आत्तापर्यंत संक्रमण झाले असून त्यातील 43 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. आजवर सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील 1 हजार 232 तर तालुक्यातील 3 हजार 282 रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याच्या सरासरीमध्ये काहीशी घटही नोंदविली गेली असून काही दिवसांपूर्वी 96 टक्क्यांवर असणारी गती आज घटून 93.73 टक्के झाली आहे.