शिर्डी काँग्रेस शहराध्यक्षांवर लोणीत प्राणघातक हल्ला राजकीय सुडातून हल्ला केल्याचा होतोय गंभीर आरोप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हे आश्वी (ता. संगमनेर) येथील खासदार शरदचंद्र पवार यांची सभा करून शिर्डीकडे परत असताना १०-१२ अज्ञात व्यक्तींनी राजकीय सूडभावनेतून त्यांच्यावर लोखंडी गज, हॉकी स्टिक व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला असून सचिन चौगुले व सुरेश आरणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी मतदारसंघासह अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

आश्वी बुद्रुक येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार व काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा आश्वी बुद्रुक येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर चौगुले व आरणे हे आपल्या कारमधून शिर्डीकडे परत जात होते. आश्वी बुद्रुकमधूनच काही लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला. लोणीमध्ये आल्यानंतर पाच-सहा मोटारसायकल मागे व पुढे एक कार अचानक आडवी झाली. यामधून उतरलेल्या चौघांनी हॉकी स्टिक, लोखंडी गज काढून चौगुले यांच्या गाडीची मोडतोड सुरू केली. याचबरोबर त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मोटारसायकलवरील काही लोक व समोरच्या गाडीतील काही लोक असे दहा-बारा लोकांनी मिळून चौगुले व आरणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये त्यांच्या पायाची, हाताची मोडतोड झाली असून दोघेही अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. लोणीच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडली असून, राजकीय सुडापोटी झाली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेत चौकशी केली. या घटनेतील आरोपींना तातडीने पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी शिर्डी विधानसभा काँग्रेस समितीच्यावतीने करण्यात आली असून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांनी चौगुले यांच्या भेटीसाठी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.


सदर भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय असून हे दोघेही युवक कार्यकर्ते खासदार शरद पवार व आमच्या कार्यक्रमासाठी आश्वी येथे आले होते. राजकीय सुडातून पाळत ठेवून असा हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतीचे राजकारण करण्याची ही पद्धत आहे. दहशतीचे राजकारण शिर्डी व महाराष्ट्रातील जनता कदापिही सहन करणार नाही. पोलिसांनी तातडीने आरोपींना पकडून कडक कारवाई केली पाहिजे. पोलीस दलाने निरपेक्ष पद्धतीने काम करावे अशी आमची अपेक्षा आहे.
– बाळासाहेब थोरात (आमदार-संगमनेर)

Visits: 199 Today: 2 Total: 1109622

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *