वांबोरीतील कांदा व्यापार्याकडून शेतकर्यांची फसवणूक?
वांबोरीतील कांदा व्यापार्याकडून शेतकर्यांची फसवणूक?
ऐन कोरोना संकटात शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले
नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यात कांदा उत्पादनासाठी राहुरी तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील वांबोरी येथील कांदा व्यापार्याने शेतकर्यांची फसवणूक केल्याची जोरदार चर्चा झडत आहे. अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते. यामुळे आपले कांद्याचे पैसे बुडतात कि काय या कारणाने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कांदा उत्पादनासाठी वांबोरी (ता.राहुरी) येथील एका सुप्रसिद्ध कांदा व्यापार्याने अनेक शेतकर्यांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालून पसार झाल्याची चर्चा आहे. यामुळे वांबोरीत कांदा उत्पादक शेतकर्यांनी ‘त्या’ पसार व्यापार्याच्या घरी गर्दी करण्यास सुरूवात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ऐन कोरोना संकटात शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वांबोरी गावाच्या मध्यवस्तीमध्ये राहत असणारा हा तरुण कांदा व्यापारी दहा वर्षांपासून शिवार मापनुसार कांदा खरेदीचा व्यवसाय करत आहे. हा व्यापारी नेहमीच चढ्या भावाने कांदा खरेदी करत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी या व्यापार्याला कांदा देत होते. यामुळे या व्यापार्याने जिल्ह्यात चांगला जम बसविला होता.
दांडगा संपर्क व अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून या व्यापार्याचे अंदाजे सहा कोटी रुपयांचे कांदा खरेदीचे पैसे थकीत असल्याची शेतकर्यांत चर्चा आहे. संबंधित व्यापार्याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांचे कांदे खरेदी केले आहेत. आता हे सर्व व्यापारी वांबोरीतील त्याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद आढळून आले आहे.