गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यातील अबाधित रुग्णांमध्ये दररोज वाढ होण्याचा सिलसिला आजही सुरू असून आज संगमनेर शहरातील सहा जणांसह तालुक्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसातील सरासरीच्या तुलनेत आज आढळलेल्या रुग्णांची संख्या निम्मी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील रुग्ण संख्येत आजही भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 1 हजार 323 वर पोहोचली आहे. त्यातील केवळ 140 रुग्ण सक्रिय संक्रमित आहेत.

पंधरवड्यापूर्वी दहा ते वीस इतक्याच प्रमाणात सापडणाऱ्या रुग्णांमध्ये मध्यंतरी अचानक वाढ होत 30 ते 50 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येऊ लागल्याने तालुक्यात काहीशी खळबळ उडाली होती. अधून मधून या संख्येत घटही होत असल्याने संगमनेरकरांना धक्कादायक स्थितीतही दिलासा मिळत होता. मात्र तो फार काळ टिकत नव्हता. कालही तालुक्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने संगमनेरकरांना मोठा धक्का बसला होता. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या घटून शहरातील सहा जणांसह 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरकरांना धक्क्यातही काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील पोफळे मळा परिसरात कोविडचा शिरकाव झाला असून तेथील 22 वर्षीय तरुणीला संक्रमण झाले आहे. त्यासोबतच अभिनव नगर परिसरातील 33 वर्षीय तरुण, कासारा दुमाला मधील 52 वर्षीय इसम, साकुर मधील 47 वर्षीय तर वडगाव पान मधील 65 वर्षीय इसमाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यासोबतच प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत शहरातील साळीवाडा परिसरातील सतरा वर्षे वयाच्या दोघा तरुणांसह घोडेकर मळा परिसरातील 34 वर्षीय तरुण व तीस वर्षीय महिला, राजापूर मधील 39 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 21 वर्षीय तरुणी, तर घुलेवाडीतील 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही तेरा रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 1 हजार 323 वर पोहोचली आहे.

वाढत्या रुग्ण संख्येतही संगमनेरकरांसाठी अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले असून संगमनेर तालुक्यातील संक्रमित रुग्ण बरे होण्याची सरासरी आज कमालीची उंचावली असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 88.39 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. तालुक्याच्या संख्येने दीड हजारांचा डोंगर दाखवला असला तरीही प्रत्यक्षात त्यातील केवळ 140 रूग्ण सक्रिय संक्रमित आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 158 रुग्णांनी उपचार पूर्ण करून घर गाठले आहे. तर दुर्दैवाने तालुक्यातील पंचवीस जणांचा बळीही गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *