शिर्डीतील साईसमाधी मंदीर तातडीने खुले करा ः खा.डॉ.विखे
शिर्डीतील साईसमाधी मंदीर तातडीने खुले करा ः खा.डॉ.विखे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्यांचे देणार निवेदन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही?, असा सवाल करतानाच शिर्डीतील साईसमाधी मंदीर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे, ते तातडीने खुले करण्यात यावे,’ अशी मागणी भाजपचे नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावा, यासाठी अनेकदा मागणी करून ती लावून धरणार्या डॉ.सुजय विखे यांनी आता शिर्डीतील साईबाबा मंदीर खुले करण्याची मागणी केली आहे. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देणार असल्याचे डॉ.विखे यांनी सांगितले. शिर्डीत कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त शिर्डीत आलेल्या डॉ.विखे यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेले साईबाबा मंदीर साडेपाच महिन्यांपासून बंद आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही? राज्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळे आहेत. ऑनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे ते नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्य सरकारने परवानगी देण्याची गरज आहे. शिर्डीचे सर्व अर्थकारण येणार्या भाविकांवर अवलंबून आहे. मंदीर बंद असल्याने सध्या सर्व व्यवहार ठप्प आहेत. केंद्र सरकारने विविध उपायोजना राबवून देशवासींयाना मदत केली आहेच. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या इतर गरजा देखील मोठ्या आहेत. त्यामुळे येथील अर्थकारण पुन्हा सुरळीत होण्यासाठी तातडीने निर्णय होण्याची गरज आहे. आवश्यक ते नियम व अटी पाळून मंदीर उघडण्याबाबत राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असं खासदार विखे म्हणाले.
हवा भरण्याचे खरे ठिकाण कोणते? ः खा.डॉ.विखे
राज्यातील महाविकास आघाडीला विरोधकांनी रिक्षा संबोधले आहे. तो संदर्भ देत टीका करताना खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले, ‘जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या या सरकाराच्या चाकांतील हवा कमी झाली आहे. त्यात हवा भरण्याचे ठिकाण मुंबईला, बारामतीला की संगमनेरला आहे, हा खरा प्रश्न आहे. आम्ही सरकार पाडू इच्छित नाही. सरकार आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी चांगले चालवावे अशी आमची इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत.’