तांबेंनी खोचक ट्वीट करून केलं पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन
तांबेंनी खोचक ट्वीट करून केलं पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर खोचक ट्वीट करून पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन केलं आहे.
![]()
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेसकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने तांबे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘तुम रोक ना पाओगे, वह तूफान बन कर आएगा। आज का बेरोजगार, तुम्हारी सत्ता उड़ा ले जाएगा…’ असं तांबे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. टाळेबंदीनंतर घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, त्यातून देशातील जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसने काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध घटकांशी चर्चा करून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक पॅकेजचा कुठलाही फायदा झाला नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. उलट बेरोजगारी वाढली. केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना कुठलाही दिलासा देऊ शकले नाही, असा आरोपही करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सत्यजीत तांबे यांनी आज ट्वीट केलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी राष्ट्रीय बेरोजगार दिवस असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

