शहरालगतच्या जोर्वे येथे पाच दिवसातच सापडले तब्बल 25 रुग्ण..! शहरी रुग्णगती थोपली मात्र, ग्रामीण रुग्णवाढीला मिळाली काहीशी गती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याच्या सुरुवातीला समाधानाचा सुखद् धक्का देणार्या कोविडने दोनच दिवसांत चित्र पालटले असून सुरुवातीच्या सरासरीत भरही घातली आहे. आजच्या अहवालातून रुग्णसंख्या फुगण्यासोबतच ग्रामीण भागातील जोर्वे येथे कोविडचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी तेथील 13 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे प्राप्त झाल्याने तालुक्याच्या ग्रामीणभागात काहीशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या पाचच दिवसांत तब्बल 150 रुग्णांची भर घालणार्या कोविडने सरासरीतील वाढते सातत्य कायम राखतांना आजही 35 रुग्णांची भर घातली आहे. त्यामुळे बुधवारी बाधितांचे 44 वे शतक ओलांडणार्या संगमनेर तालुक्याची आजची रुग्णसंख्या आता 4 हजार 440 वर पोहोचली आहे.

सप्टेंबरमध्ये तालुक्यातील रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला. या एकाच महिन्यात एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 51 रुग्ण वाढून महिना अखेर तब्बल 1 हजार 529 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याने सप्टेंबरमध्येच चार हजाराचा आकडा ओलांडीत 43 व्या शतकाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता. रुग्णवाढीची हिच गती ऑक्टोबरमध्येही राहील असे वाटत असतांना गेल्या महिन्याने मात्र संगमनेरकरांना मोठा दिलासा देत रुग्णसंख्येची गती कमी केली. गेल्या महिनाभरात दररोज 33.65 च्या सरासरीने रुग्ण समोर आले.

सप्टेंबरच्या तुलनेत दररोजच्या सरासरीत जवळपास 17 रुग्ण कमी झाल्याने ऑक्टोबरमध्ये एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 43 रुग्णांची भर पडली. संपूर्ण महिन्याने उतरत्या क्रमाने रुग्णसंख्या दाखवित संगमनेरात समाधानाचे वातावरण निर्माण केलेले असताना महिन्याच्या शेवटच्या दिवशी मात्र तब्बल 64 रुग्ण समोर आल्याने तालुक्याच्या रुग्णवाढीचा वेग काहीसा उंचावला. मात्र चालू महिन्याने सुरुवातीला दिलासा देत 1 नोव्हेंबररोजी शहरातील पाच जणांसह एकूण सतरा, 2 नोव्हेंबररोजी शहरातील शून्य रुग्णांसह ग्रामीणभागातील 32, 3 नोव्हेंबररोजी 30, बुधवारी (ता.4) 28 तर आज शहरातील पाचांसह एकूण 35 अशा एकूण सरासरी 30 रुग्ण दररोज या गतीने 150 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्याची सुरुवातही समाधानकारक असली तरीही सुरुवातीला कमी झालेली रुग्णगती पुन्हा वाढल्याने ग्रामीणभागातील संक्रमणाबाबत काहीशा चिंता वाढल्या आहेत.

आजही गेल्या चार दिवसांचाच कित्ता गिरवित कोविडने तालुक्याच्या रुग्णसंख्येत 35 नवीन बाधितांची भर घातली. यातील अवघे पाच रुग्ण शहरातील तर 30 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आज खासगी प्रयोगशाळेकडून 9 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 26 जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील नवीन अकोले रस्त्यावरील 39 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण, घासबाजार परिसरातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व पंचायत समितीच्या परिसरातील 58 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला. शहरातील रुग्णगती आजही सरासरी प्रमाणे कायम आहे, मात्र ग्रामीण भागातील संक्रमणात आज काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकट्या जोर्वे या शहरालगतच्या गावातून आज एकाच दिवसात 13 तर गेल्या 1 नोव्हेंबर पासून आज अखेर तब्बल 25 रुग्ण समोर आले आहेत.

जोर्वे येथून आज 54 व 50 वर्षीय इसमासह 34, 27 व 25 वर्षीय तरुण, 62, 50, 45, 42, 40, 36, 30 व 25 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 52 व 45 वर्षीय इसम, खळी पिंपरी येथील 20 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 32 व 28 वर्षीय महिला, निमज येथील 58 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 36 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 51 वर्षीय इसम, समनापुर येथील 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 46 वर्षीय इसमासह 22 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 34 वर्षीय तरुणासह 31 वर्षीय महिला, कनकापूर येथील 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 57 वर्षीय इसम व पिंपरी लौकी येथील 49 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात आजही संक्रमणाचा आलेख काहीसा उंचावणारा ठरल्याने ग्रामीण क्षेत्रातील चिंता वाढल्या आहेत. त्यातच नागरिकांकडून नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास सणासुदीच्या काळात रस्त्यावर होणाऱ्या गर्दीतून संक्रमणात भर पडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. आज तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत पस्तीस रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 4 हजार 440 वर पोहोचली आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून संगमनेर शहरातील रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे बघायला मिळाले. सप्टेंबरमध्येही हिच श्रृंखला कायम असून तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रापेक्षा शहरी रुग्ण समोर येण्याचे प्रमाण सुमारे पाचपटीने कमी आहे. गेल्या महिन्याचा विचार करता संपूर्ण महिन्यातील 31 दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत दररोज 33.65 च्या गतीने 1 हजार 43 रुग्णांची भर पडली. यात शहरीभागातील रुग्णगती अवघी 6.16 तर ग्रामीणभागातील रुग्णगती 27.48 रुग्ण दररोज अशी होती. चालू महिन्यातील पहिल्या चार दिवसांत गेल्या महिन्यातील रुग्णगती पेक्षा एकूण सरासरीत घट झाली आहे. सध्या दररोज 30 च्या गतीने दररोज एकूण रुग्ण समोर येत आहेत. त्यात शहरी रुग्णगती आणखी कमी होवून 5.75 तर ग्रामीण रुग्णगती 23 रुग्ण दररोज अशी आहे.

