मतभेद बाजूला करून शिवसेनेची नव्याने बांधणी करा ः घोसाळकर शिवगर्जना अभियानानिमित्त संगमनेरात शिवसैनिकांचा मेळावा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी जुन्या-नव्या शिवसैनिकांना विश्वासात घेऊन एकमेकांत असणारे मतभेद बाजूला करत सर्वांना बरोबरीने घेऊन हातात हात घालून शिवसेनेची पुन्हा नव्याने बांधणी करावी, असा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी दिला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने शिवगर्जना अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राबविण्यात येणार्‍या अभियानाच्यानिमित्ताने संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात घोसाळकर बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते विनोद कदम, हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवासेनेचे साईनाथ दुर्गे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख महेश नवले, जिल्हा संघटक सपना मोरे, माजी जिल्हा उपप्रमुख रावसाहेब गुंजाळ, शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी प्रमुख शीतल हासे, सुरेखा गुंजाळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विकास डमाळे, राजू सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना घोसाळकर म्हणाले, शिवसेनेतून जे 40 बडवे बाहेर गेले आहेत आहे ते त्यांच्या डोक्याने नव्हे तर मोदी-शहाच्या डोक्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून गेले आहेत. मात्र शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनता या मिंध्ये सरकारच्या बरोबर नाही तर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी प्रत्येक गावागावात शहराशहरात जाऊन जनतेत जनजागृती करावी. आता आपल्याला नुसते लढायचे नाहीतर जिंकेपर्यंत लढायचे आहे असे पटवून द्या असे आवाहन त्यांनी नूतन पदाधिकार्‍यांना केले.

उपनेते विजय कदम म्हणाले, गद्दार जरी पक्ष सोडून गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा आपल्या बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात गद्दारांविषयी चीड आहे, ती चीड आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीतून दाखवून द्या. सध्याच्या भाजपच्या कूटनीतीच्या धोरणामुळे लोकशाहीवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. अशा भाजपच्या दावणीला हे 40 गद्दार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकच आता खर्‍या अर्थाने आमदार होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले, शिवसेनेने ज्यांना सर्व काही दिले त्यांनीच उद्धव ठाकरेंना त्रास दिला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी सर्वांनी पेटून उठावे. जे गद्दार गेले आहे ते फक्त पैशांच्या लालसेपोटी गेले आहे. शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे पुन्हा निवडून येणे सोडाच तर त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी मी लढत राहणार आहे. आगामी काळात या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार मी असू अगर नसू, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचाच खासदार होणार अशी सर्वांनी खूनगाठ बांधून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याचे प्रास्ताविक नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले तर आभार जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी मानले.


आमच्यात भगवे रक्त असेपर्यंत लढत राहू ः शेख
जोपर्यंत आमच्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भगवे रक्त आहे. तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करु. त्यांचे विचार संगमनेर, अकोले आणि राहता (शिर्डी) या तालुक्यांतील गावागावांत पोहचवू असा विश्वास नूतन जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी व्यक्त केला.

Visits: 101 Today: 1 Total: 1105321

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *