संगमनेर बसस्थानकात गुटखा-तंबाखू पिचकार्‍यांचा सडा स्वच्छतेकडे लक्ष देऊन बेशिस्तांवर कडक कारवाईची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराचे वैभव वाढविणार्‍या बसस्थानकात सध्या अस्वच्छता दिसून येत आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेल्या ठिकाणीच गुटखा व तंबाखू पिचकार्‍यांचा सडा दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात प्रवाशांच्या आरोग्याचा याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. याकडे वेळीच संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी सूज्ञ प्रवाशांनी केली आहे.

शहराच्या वैभवात भर घालणारे आणि राज्यात लौकिक मिळविणार्‍या बसस्थानकात सर्वदूर जाण्यासाठी प्रवासी दाखल होतात. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेकांचाही येथे राबता असतो. सुसज्ज व अत्याधुनिक असलेल्या बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे. परंतु, येथे गुटखा व तंबाखूचे सेवन करणार्‍यांकडून पिचकार्‍यांचा सडा पडत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे इतर प्रवाशांची पाणी पिण्यासाठी कुचंबना होत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीच अस्वच्छता असल्याने प्रवाशांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

एरव्ही गर्दीने गजबजणारे बसस्थानक सध्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे सुनेसुने आहे. मात्र, तरी देखील बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. कोरोना संकटात शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतु, येथे ही कारवाई दिसून येत नाही. यातून प्रवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी वेळीच लक्ष घालून बेशिस्तांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Visits: 191 Today: 2 Total: 2165193

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *