वांबोरी ग्रामस्थांची नव्या पाच रोहित्रांची मागणी

 

नायक वृत्तसेवा, राहुरी
घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा करणार्‍या वांबोरी गावठाण हद्दीतील पाच रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शंभर अश्वशक्तीची नवी पाच रोहित्रे मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे. त्यावर, महावितरणच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन रोहित्र देण्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले आहे.

याविषयी भिटे म्हणाले, मुळा-प्रवरा वीज संस्था अस्तित्वात असताना वांबोरी शहरासाठी अर्चना, रामदेवबाबा, पारख, बाजारतळ व देहरे वेस येथे रोहित्रे बसविण्यात आली. त्यावर घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शासकीय कार्यालये, पथदिवे असे 1755 वीजजोड आहेत. वीजेचा वापर व ग्राहकांची संख्या वाढल्याने रोहित्रांची क्षमता अपुरी पडत आहे. प्रत्येक रोहित्रावर क्षमतेच्या दीडपट जास्त भार असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. 100 अश्वशक्तीची नवी पाच रोहित्रे मिळाली तर वीज पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास संकेत पाटील, पांडुरंग मोरे, विकास दगलवाज, लक्ष्मण कुसळकर, रवींद्र पटारे, सचिन पटारे, सचिन साळुंके, पिराजी धनवडे, उमेश कुसमुडे, देविदास दळवी, सचिन गायकवाड आदिंनी व्यक्त केला आहे.

 

Visits: 9 Today: 1 Total: 117970

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *