स्थानिकांना टोल फ्रि राहणार मात्र नोंदणी अनिवार्य! शेतकर्‍यांना मात्र पन्नास टक्के सवलत; टोलवरुन वाद उफाळणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोल नाक्यावर बुधवारी लावण्यात आलेल्या एका फलकाने स्थानिक वाहनधारकांची अस्वस्थता वाढली आहे. याबाबत टोल अधिकार्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता स्थानिक छोट्या प्रवाशी वाहनांना टोलमाफी कायम असल्याचे, मात्र त्यासाठी शंभर रुपये शुल्क भरुन नोंदणी अनिवार्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी शेतकर्‍यांना मात्र संपूर्ण टोलमाफीची सुविधा मिळणार नसल्याचेही स्पष्ट झाले असून त्यावरुन आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. टोल कंपनीने स्थानिक मालवाहतूक वाहनांना टोल शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. टोलमाफीस पात्र प्रवाशी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य असल्याचे व 16 मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करण्याचे आवाहन टोल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नव्याने उभारलेल्या खेड-संगमनेर महामार्गावर फेब्रुवारी 2017 पासून टोलवसुली सुरु करण्यात आली. त्यावेळी स्थानिकांकडूनही सरसकट टोल वसुली सुरु झाल्याने हिवरगाव टोलनाक्यावर आंदोलन सुरु झाले. त्यामुळे प्राधिकरणाने 20 किलोमीटरच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना आवश्यक ओळखपत्र दाखवल्यानंतर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ स्थानिक पातळीवरील प्रवाशी आणि मालवाहतूकदारांनी आजवर घेतला. मात्र आता गेल्या वर्षभरापासून टोलवसुलीचा ठेका चालवणार्‍या नागपूरच्या पृथ्वी बिल्डर्स कंपनीने नियमांमध्ये बदल करुन सरसकट टोलमाफी नाकारली आहे.


2017 पासून टोलमाफी सुरु असतानाही कोविड संक्रमणानंतर जवळजवळ अनिवार्य झालेल्या फास्टटॅगमधून स्थानिक वाहनधारकांच्या खात्यातून पैसे कापले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र ती व्यवस्था स्वयंचलित असल्याने त्याला टोल प्रशासनाचा नाईलाज असल्याचे सांगितले जात. त्यावरुन वादावादीही होत. मात्र केंद्र सरकारने टोलनाक्यांवरील वसुली पूर्णतः ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतल्याने फास्टटॅग अनिवार्य आहे. त्यातून स्थानिकांना सवलत देण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे टोल प्रशासनाने कळविले आहे.


त्यानुसार वाहनाचे नोंदणी कागदपत्र व आधार कार्डसह 16 मार्चपूर्वी टोल प्लाझावर जावून नोंदणी करावी. त्यासाठी प्रवाशी वाहनांनाच पूर्ण सवलत मिळणार असून मालवाहतूक वाहनांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी फास्टटॅग बसवणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रवाशी वाहनांना (कार व जीप) नेहमीप्रमाणे सवलत मिळेल, नोंदणी झाल्यानंतर फास्टटॅगद्पारे कपात होणारी रक्कम शून्य असल्याचा संदेश वाहनधारकाला मिळेल, म्हणजेच खात्यातून कोणतीही रक्कम कापली जाणार नसल्याची ग्वाही टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


संगमनेरच्या पठारभागासह चंदानापूरी पंचक्रोशीतून असंख्य शेतकरी दररोज आपली शेती उत्पादने घेवून संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अथवा बाजारात येत असतात. टोल प्रशासनाच्या नव्या नियमानुसार यापुढे आता मालवाहतूक करणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांच्या वाहनांकडूनही 50 टक्के सवलतीच्या दराने टोल वसुली केली जाणार असल्याने त्यातून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मात्र तूर्त प्रवाशी वाहनधारकांनी 16 मार्चपूर्वी शंभर रुपये शुल्क भरुन नोंदणी करावी.

Visits: 25 Today: 1 Total: 116742

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *