‘हिरा’ गुटख्याचा मालकच जिल्ह्यातील गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार! तपास अधिकारी बदलताच जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या कड्या उलगडू लागल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईत जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा बाजूला सरकल्यानंतर आता त्यामागील एक एक कडी उलगडू लागली आहे. अर्थात या प्रकरणाचा यापूर्वी तपास करणार्या अधिकार्यांभोवती संशयाचे वलय निर्माण झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी तपासी अधिकारी बदलला, आणि त्याचे परिणामही आता समोर आले असून राज्यातील गुटखा तस्करीत ‘हिरा’ गुटख्याचा उत्पादक तथा मालक अस्लम तांबोळी हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच पुण्यातील एका वाहतुकदाराचे नावही समोर आले असून त्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. गुटखा तस्करीत थेट उत्पादकावर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दैनिक नायकने निमगाव जाळीतील गुटखा तस्करीच्या केंद्रावर प्रकाश टाकला होता, त्या वृत्तातच निपाणीतून निमगाव जाळीपर्यंत थेट गुटखा पोहोचवला जात असल्याची बाबही दैनिक नायकने समोर आणली होती, शिर्डीच्या पोलीस उपअधीक्षकांनी त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे.
गेल्या महिन्यात श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी एकलहरे शिवारातील कलिम शेख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड वजा गोदामावर छापा घालीत जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा हटविला होता. या प्रकरणाच्या अधिक तपासातून राहाता तालुक्यातील निमगाव निघोज येथील विजय शांतीलाल चोपडा व संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील संतोष ज्ञानदेव डेंगळे या दोघा मुख्य सूत्रधारांची नावे समोर आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले, त्यातच त्या दरम्यान तपासी अधिकार्यांनी या दोघांकडून जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ज्यांच्यापर्यंत तस्करीचा गुटखा पोहोचवला जातो अशा पन्नासाहून अधिक व्यापार्यांना श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पाचारण करुन चौकशी केली. मात्र कोणतीही कारवाई न करताच त्यांना सोडून देण्यात आल्याने पो.नि.बहिरट यांच्यावरील संशय बळावला होता.
यानंतरही या प्रकरणाच्या तपासात अनेक बाबी संशय निर्माण करणार्या घडत गेल्याने श्रीरामपूरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे सारख्या काहींनी श्रीरामपूर पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत थेट नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्याचा परिणाम गुटखा प्रकरणाचा तपास पो.नि.बहिरट यांच्याकडून काढून घेण्यात आला व तो शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासी अधिकारी बदलताच गुटखा तस्करीच्या तपासाला गती मिळाली. मात्र सदरचा तपास सातव यांच्याकडे येण्यापूर्वीच या प्रकरणातील सुरुवातीला सूत्रधार म्हणून समोर आलेल्या चोपडा व डेंगळे यांच्यासह अटकेतील उर्वरीत संशयित आरोपींना जामीनही मंजूर झाला. त्यामुळे या प्रकरणात नव्याने आरोपी निष्पन्न करण्यासह आधीच्या तपासी अधिकार्यांनी निष्पन्न केलेल्या सूत्रधाराच्या पुढे जावून तपास करण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते.
उशीराने तपास हाती घेवूनही पोलीस उपअधीक्षक सातव यांनी कसोशीने तपासाच्या मूळात जावून जिल्ह्यातील गुटखा तस्करीचा धागा थेट कर्नाटकातील निपाणीपर्यंत नेला. कर्नाटकात गुटखा विक्रीला मनाई आहे, मात्र उत्पादनाला मनाई नसल्याने महाराष्ट्राच्या सीमेवरील निपाणीत गुटखा निर्मितीचे काही कारखाने आहेत. त्यातील एक कारखाना ‘हिरा’ गुटख्याचाही आहे. तपासात जिल्ह्यात येणारा माल निपाणीतूनच येत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सगळ्या कड्या जुळविल्या असता ‘हिरा’ गुटख्याचा उत्पादक व मालक असलेला अस्लम तांबोळी हाच राज्यातील गुटखा तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले.
अस्लम शेख हा पुण्यातील कोंढवा भागात राहणार्या शहजाद तौफिक खान (वाहतूकदार) याच्या मदतीने राज्यभर गुटख्याचे वितरण करीत असल्याचेही समोर आले आहे. शहजाद आपल्या वाहनातून निपाणी येथून गुटखा घेवून चोपडा व डेंगळे यांच्या सारख्या राज्यातील अनेक जिल्हा तस्करांपर्यंत सहिसलामत पोहोचवण्याचे काम करतो. निपाणी ते अहमदनगर हे जवळपास साडेपाचशे किलोमीटर अंतर कापतांना रस्त्यात येणारे सर्व अडथळे अस्लम आणि शहजाद हे दोघे मिळून दूर करीत व जिल्ह्यातील गुटखा तस्करांच्या गोदामापर्यंत माल पोहोचवत, तेथून पुढे संबंधित जिल्हा तस्कर तालुकानिहाय छोट्या-छोट्या वितरकांपर्यंत तो पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आता या दोघांनाही आरोपी करण्यात आले असून हिरा गुटख्याचा उत्पादकच या संपूर्ण गोरखधंद्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांसह आता जिल्ह्यातील गुटखा तस्करीची व्याप्ती वाढून एकूण दहा आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये दैनिक नायकने निमगाव जाळी हे जिल्ह्यातील सर्वात मोठे गुटखा तस्करीचे केंद्र असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याच वृत्तात निमगाव जाळीतील या गुटखा तस्कराच्या गोदामापर्यंत माल पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित गुटखा उत्पादक कंपनीच घेत असल्याचे व तो सहीसलामत त्याच्यापर्यंत पोहोचतही असल्याचे वास्तव समोर आणले होते. मात्र स्थानिक पोलिसांच्या हितसंबंधांमुळे आजवर ना निमगाव जाळीतील डेंगळेवर कारवाई झाली, ना कोणी पैसे वाटणारी ही साखळी शोधली. मात्र आता शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी कमी कालावधीतच यासर्व कड्या एक एक करीत उलगडण्यास सुरुवात केली असून त्यातून दैनिक नायकने जवळपास दिड वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.
सदरचे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीचे तपासी अधिकारी श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी विजय चोपडा व संतोष डेंगळेंसह मोजकेच आरोपी उघड केले. या दोघांकडून तालुकानिहाय कोणाकोणाला मालाचा पुरवठा होतो, त्यांच्याकडून पानटपरीपर्यंत कसा माल पोहोचवला जातो या साखळीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता मात्र या प्रकरणाच्या मूळातच पोलिसांनी हात घातल्याने जिल्ह्यासह संगमनेरातील गुटखा तस्करांवरील पडदेही हळूहळू बाजूला सरकण्याचे संकेत मिळाले असून संगमनेरच्या गुटखा तस्करीतील ‘पांडवां’चे धाबे दणाणले आहेत.