खंडोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी शारदा पतसंस्थेचा हातभार! भाविक-भक्तांसह सहकारी संस्थांही पुढे सरसावल्या; मदतीचा ओघ सुरु
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या संगमनेरातील साळीवाडा येथील मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरु आहे. या कामासाठी शेतकरी, गोरगरीब मजूरापासून ते तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यापार्यांपर्यंत अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. या कार्यात आता शहर व तालुक्यातील सहकारी संस्थाही पुढे आल्या असून संगमनेरातील शारदा नागरी सहकारी पतसंस्थेने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 21 हजार रुपयांची मदत दिली आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.योगेश भुतडा यांनी देणगीचा धनादेश विश्वस्त मंडळाच्या हाती सोपविला.
अतिशय प्राचिन आणि जागृत समजल्या जाणार्या शहरातील साळीवाडा परिसरात श्री खंडोबारायाचे पुरातन मंदिर आहे. सन 1943 साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. 1980 साली मंदिराचे मालक रामनाथ पडतानी यांना दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी मंदिराच्या लगत खोदकाम केले असता तेथे त्यांना बुजविलेला आड आढळून आला, त्याचे पूर्ण खोदकाम केल्यानंतर त्यातून दगडात घडविलेल्या देवाच्या मूर्ती, शिवलिंग व पादुका सापडल्या. मोठा सोहळा आयोजित करुन त्यावेळी या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली हाती. दोन दशकांपूर्वी या मंदिराचे व्यवस्थापन व वार्षिक उत्सव साजरे करण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली.
सध्या विश्वस्त मंडळाकडून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. मंदिराचा गाभारा आणि सभामंडपाचे काम अजूनही सुरु असून त्यासाठी भाविकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर देवाच्या शिखरी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा कळस बसविण्याचा संकल्पही विश्वस्त मंडळासह भाविकांनी केला आहे. त्यासाठी गावोंगावी सुवर्णकलश संकल्प झोळी फिरवली जात असून त्यालाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी सुवर्ण कलशासाठी सोने अथवा रोख स्वरुपात दान दिले आहे.
मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी संगमनेरातील भाविकभक्तांसह विविध संस्था व आस्थापनेही पुढे आली आहेत. यापूर्वी संगमनेर मर्चंटस् बँक, महेश नागरी पतसंस्था, सर्वोदय नागरी पतसंस्था, चौंडेश्वरी पतसंस्था अशा अनेक सहकारी संस्थांनी रोख स्वरुपात हातभार लावला आहे. आता या कडीत शारदा नागरी पतसंस्थेचीही भर पडली असून संस्थेने संस्कृती संवर्धनाच्या या कार्यासाठी 21 हजार रुपयांची मदत दिली आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.योगेश भुतडा, व्हा.चेअरमन अमर झंवर, संचालक सीए संकेत कलंत्री, कैलास राठी, कैलास आसावा, व्यवस्थापक माधव भोर यांनी श्री मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मदनलाल पारख, खजिनदार अप्पा केसेकर, विश्वस्त गोविंद भरीतकर आदींच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश सुपूर्द केला. रविवारी (ता.13) संचालक मंडळाच्या हस्ते खंडोबारायाची महाआरतीही करण्यात आली.