श्रीगणरायांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल ः पवार
श्रीगणरायांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल ः पवार
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचेही केले आवाहन
मुंबई, वृत्तसंस्था
श्रीगणरायांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोनाचे संकट दूर कर महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असे साकडे पवार यांनी गणपती बाप्पांना घातले आहे. बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचे भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सुरक्षित अंतराचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सव संदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे, असंही पवार म्हणाले. गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे.
बुद्धीची देवता श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी गर्दी टाळून, सुरक्षित अंतराचे नियम पाळून सण साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग रोखला जाईल आणि बाप्पांच्या कृपेनं महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, अशी खात्री वाटते.
पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘करोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री असणार्या अजित पवार यांनी शुक्रवारीच केल्या आहेत.