बावीस कोटींची राख होवूनही वखार महामंडळाच्या गोदामाची आग शमेना! लाखो लिटर पाण्याचा मारा तरी चाळीस तासांनंतरही उठताहेत कापसातून आगीचे लोळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या धान्य गोदामाला लागलेली आग चाळीस तासांनंतरही धुमसतच आहे. बुधवारी दुपारी ही आग आटोक्यात आणल्यानंतर सायंकाळी सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने जिल्ह्यातील चौदा अग्निशमन बंबांच्या मेहनतीवर पाणी फेरले आणि जवळपास विझलेली आग पुन्हा भडकली, ती अद्यापही सुरुच असून ती विझवण्यासाठी पालिका व संगमनेर कारखान्याच्या बंबांचे परिश्रम सुरुच आहेत. तब्बल चाळीस तासांपूर्वी लागलेल्या या भीषण आगीत 20 कोटी रुपयांच्या धनधान्यासह एकूण 22 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या मंगळवारी (ता.27) संगमनेर शहरातील जनता नगर व इंदिरानगर या प्रचंड गजबजलेल्या वसाहतींच्या मध्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वखार महामंडळाच्या धान्य गोदामाला आग लागली होती. या गोदामात जवळपास 17 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा कापूस व त्यासह मिरी, सोयाबीन, गहू, बाजरी व मोठ्या प्रमाणात चना साठवून ठेवलेला होता. अज्ञात कारणाने लागलेल्या आगीने सुरुवातीला कापसाच्या गंजी पेटल्याने अग्निशमन बंब येईपर्यंत या आगीने रौद्ररुप धारण केले होते. सुरुवातीला संगमनेर नगरपालिका व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे प्रत्येकी दोन अग्निशमन बंब आणि मालपाणी उद्योग समूहाच्या टँकरद्वारा या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाला, मात्र गोदामातील संपूर्ण कापूस आणि धनधान्याचे एकाचवेळी पेट घेतल्याने या दोन्ही बंबांना सदरची आग आटोक्यात आणणे अशक्य झाले.

त्यामुळे प्रशासनाने अकोले, प्रवरानगर, कोपरगाव, शिर्डी, राहाता व श्रीरामपूर येथील अग्निशमन बंबांना पाचारण केले. मंगळवारी रात्री 10 वाजता या सर्व बंबांद्वारे वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले ते बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरुच होते. बुधवारी ही आग बहुतेक नियंत्रणात आल्याचे चित्र दिसू लागल्याने प्रशासनाने अन्य ठिकाणांहून बोलावलेले अग्निशमन बंब माघारी पाठविले. मात्र दुर्दैवाने त्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांतच सोसाट्याच्या वार्‍यासह वादळाने हजेरी लावल्याने जवळपास विझत असलेल्या आगीचा पुन्हा भडका उडाला आणि दुपारी पुन्हा पाठविण्यात आलेले सर्व अग्निशमन बंब पुन्हा बोलावण्याची वेळ प्रशासनावर आली.

आज पहाटेपर्यंत या बंबांद्वारा पुन्हा या गोदामात हजारो लिटर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी अन्य िइकाणचे बंब परत पाठवण्यात आले आहेत. सध्या या गोदामातील जवळपास 90 टक्के आग विझली असून राहिलेले निखारे विझवण्यासाठी पालिका व थोरात कारखान्याच्या बंबांद्वारे प्रयत्न सुरु आहेत. पुढील तास-दोन तासांत ही आग पूर्णतः विझेल असा विश्वास तहसीलदार अमोल निकम यांनी व्यक्त केला आहे. गेल्या चाळीस तासांपासून सुरु असलेल्या या आगीने तब्बल 20 कोटी रुपयांचे धनधान्य व दोन कोटी रुपयांच्या गोदामाला अक्षरशः भस्मसात करुन त्याची राख केली आहे. वखार महामंडळाच्या एकाच गोदामाला लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चाळीस तासांचा अवधी लागला.


वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीने 1990 च्या दशकांत मेनरोडवर लागलेल्या आगीची अनेकांना आठवण करुन दिली. त्यावेळच्या आणि आजच्या संगमनेरमध्ये मात्र आमुलाग्र बदल असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वखार महामंडळाच्या केवळ एका गोदामाची आग आटोक्यात आणण्यासाठी अकरा अग्निशमन बंबांना तब्बल 40 तासांचा कालावधी लागला आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. या घटनेने संगमनेरच्या आपत्ती व्यवस्थापनासमोरही अनेक प्रश्न उभे केले आहेत. विशेष म्हणजे सदरचे गोदाम पालिकेच्या जनतानगर जलकुंभाच्या अगदी जवळच आहे, मात्र तरीही आग विझवण्यासाठी आलेल्या सर्व बंबांना क्रीडा संकुलाजवळील जलकुंभावरुनच पाणी भरावे लागत होते. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 115226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *