भोगीच्या पूर्वसंध्येला सासूच्या घरात जावयाचा ‘डल्ला’! घरफोडीच्या गुन्ह्याखाली जावयाला बेड्या; घुलेवाडीतील अजब चोरीची गजब कहाणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सणासुदीच्या काळात पाहुणे-रावळे घरी येतात, गोडधोड होतं आणि आनंदाची देवाणघेवाण होते. पण संगमनेर नजीकच्या घुलेवाडीतून मात्र ‘भोगी’च्या पूर्वसंध्येला एक अजबच प्रकार समोर आला आहे. पत्नीशी असलेल्या वादाचा राग मनात धरुन एका पठ्ठ्यानेे चक्क आपल्या सासूच्या बंद घरालाच लक्ष्य केलं. सासू घरी नसताना जावईबापूंनी घराची कडी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील ऐवजावर डल्ला मारला. या ‘चोरट्या’ जावयाची ही करामत उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दाखल तक्रारीवरुन त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, या अजब चोरीची गजब चर्चा घुलेवाडीसह आता संपूर्ण शहरभर रंगली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 36 वर्षीय फिर्यादी महिला आपला कमावता मुलगा आणि पतीपासून विभक्त झालेल्या मुलीसह घुलेवाडी परिसरात राहते. पती-पत्नीमध्ये वाद असल्याने मुलगी आईकडेच आश्रयाला आहे. मात्र, जावई अजय रंगनाथ पवार याला दोघांमधील दुरावा सहन होत नव्हता. त्यामुळे तो अधूनमधून सासरच्या घरी म्हणजे घुलेवाडीत येवून वादही घालायचा. पण हा राग थेट चोरीच्या मार्गाला जाईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.


भोगीच्या पूर्वसंध्येला फिर्यादी महिला काही कामानिमित्त चंदनापूरी येथील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. घर बंद असल्याची ‘पक्की खबर’ जावई अजयला लागली. हीच संधी साधत त्याने सायंकाळच्या सुमारास सासरची वाट धरली. घराला कुलूप असल्याचे पाहून त्याने दरवाजाची कडी तोडली आणि घरात बेधडक प्रवेश केला. घरात शिरल्यावर जावईबापूंनी एखाद्या सराईत चोरासारखी शोधमोहीम सुरु केली. लोखंडी कपाटं, पेट्या, माळे आणि घरातील कानाकोपर्‍यात त्याने मनसोक्त उचकापाचक केली. आणि अखेर त्याच्या हाती घरातील ‘ती’ लोखंडी पेटी लागली. या पेटीचे कुलूप तोडून त्याने त्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, पदक आणि तब्बल 42 हजार रुपयांची रोकड असा एकूण 82 हजारांचा ऐवज खिशात टाकला आणि तेथून पोबारा केला.


जावई अजयला वाटले आपण कोणाच्याही नकळत हा डल्ला मारला आहे. मात्र, त्याचे दुर्दैव की, सासूच्या घरात शिरताना आणि कार्यभाग उरकल्यानंतर बाहेर पडताना शेजारच्या एका दाम्पत्याने त्याला प्रत्यक्ष पाहिले होते. शेजार्‍यांच्या जावईबापूचे अशाप्रकारे अंधारात चोरपावलांनी जाणं-येणं त्या दाम्पत्याला खटकल्याने त्यांना शंका आली. त्याचे निरसन करण्यासाठी दोघांनीही शेजारच्या बंद घराकडे जावून पाहिले असता दरवाजाची कडी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे आणि घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचेही त्यांना दिसले. याबाबत त्यांनी लागलीच चंदनापूरीला गेलेल्या शेजारणीला फोन लावून घडला प्रकार सांगितला.


आपल्या पाठीमागे जावयाने घराकडे जावून काहीतरी उपद्व्याप केल्याचा निरोप मिळताच फिर्यादी महिलेने घुलेवाडी गाठली. आणि घरात येवून पाहते तर काय? घराची कडी तुटलेली, आत सगळीकडे कपड्यांचा आणि सामानाचा पसारा पडलेला होता. बाजूलाच पडलेल्या पेटीचे कुलूपही तुटलेले पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि कष्टाची 42 हजारांची रोकड गायब झाली होती.


याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार सांगितला आणि आपल्याच जावयाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत आरोपी जावई अजय रंगनाथ पवार याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 305 (अ) अन्वये घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असून, आता जावईबापूंना सासरच्या पाहुणचाराऐवजी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे.


भोगीच्या सणाला घरची जुनी अडगळ बाहेर काढून जाळली जाते, पण येथे जावयाने स्वतःच्या रागापायी सासरच्या घराची कडी तोडून स्वतःच्याच आयुष्यात कायदेशीर संकट ओढावून घेतले आहे. सध्या घुलेवाडी आणि संगमनेरच्या पारावर या ‘धाडसी’ जावयाची खमंग चर्चा सुरु आहे.


नात्याला लागलं चोरीचं ग्रहण!
संगमनेर तालुक्यात यापूर्वीही कौटुंबिक वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, मात्र घुलेवाडीतील हा प्रकार नात्यालाच ग्रहण लावणारा आहे. सुमारे वर्षभरापूर्वी तालुक्यातील एका विवाहितेने छळाला कंटाळून सासरकडच्या दागिन्यांसह माहेर गाठल्याची चर्चा होती, पण चक्क जावयानेच सूडबुद्धीने सासूचे घर फोडण्याची ही तालुक्यातील पहिलीच ‘विचित्र’ घटना आहे. रामायणात रावणाने विभिषणाला ‘घरका भेदी, लंका ढाये..’ असे म्हटले होते, त्याचीच प्रचिती घुलेवाडीच्या या प्रकरणातही दिसून आली. घरासह घरातील सदस्यांची इंत्यभूत माहिती ठेवून जावयाने सासूला अद्दल शिकवण्याच्या नादात गुन्हेगारी मार्ग निवडला आणि पोलीस दप्तरी स्वतःच्या नावावर सराईत चोरट्याचा ठसा उमटवून बसला. सासूच्या तक्रारीनंतर भूतकाळात कधी तिच्याच हातच्या पुरणपोळ्या खाणार्‍या जावईबापूला आता पोलिसांची सुकडी खावी लागणार असल्याने त्यांच्यातील संबंध पूर्ववत होण्याच्या आशा आता मावळल्या आहेत.

Visits: 133 Today: 3 Total: 1412838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *