सोमवारी अहमदनगरसह राज्यातील दहा जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठणार? ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत नव्या निकषांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशासह राज्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार राज्यातील प्रादुर्भावग्रस्त जिल्ह्यांचे पाच पातळ्यांवर वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या पातळीत मोडणार्‍या राज्यातील दहा जिल्ह्यांमधील व्यवहार पूर्ववत सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ऑक्सिजनच्या 50 टक्के खाटा व्यापणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थितीतही मोठा बदल झाल्याने व्यवहार सुरळीत होणार्‍या राज्यातील दहा जिल्ह्यात अहमदनगरचाही समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून देशभरातून कोविडची माघार होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे देशभरातील राज्यांनी आपापल्या राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेवून त्यानुसार निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही व्यापारी, कर्मचारी, कामगार व मजूरांकडून निर्बंध हटविण्याबाबत वारंवार मागणी केली गेली, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची टक्केवारी आणि उपलब्ध ऑक्सिजन खाटांची स्थिती लक्षात घेवून राज्य सरकारने निर्णय घेण्यात कोणतीही घाई दाखवली नाही. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून राज्यातील अहमदनगरसह चंद्रपूर, धुळे, गोंदीया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमधील रुग्ण समोर येण्याची टक्केवारी पाच पेक्षा खाली आहे तर जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या खाटांवर 25 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यामुळे या दहा जिल्ह्यांचा समावेश ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत पहिल्या पातळीत झाला आहे.


30 मे रोजी जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची सरासरी गती 8.47 टक्के होती, मात्र जिल्ह्यातील 50 टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन खाटा रुग्णांनी व्यापलेल्या असल्याने जूनच्या पहिल्या आठवठ्यात जिल्ह्याला कोणताही दिलासा देण्यात आला नव्हता. मात्र मागील सात दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याच्या गतीमध्ये मोठी घसरण झाल्याने आठवड्याची सरासरी तब्बल 4.30 टक्क्यांपर्यंत खाली आली. तर मागील आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांवर असलेले रुग्ण टप्प्याटप्प्याने कमी होवून 3 जून रोजी जिल्ह्यातील केवळ 24.48 टक्के खाटांवर रुग्ण दाखल असल्याची स्थिती समोर आली. त्यामुळे कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत सुरुवातीलपासून अधिक प्रभावित असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेला अहमदनगर जिल्हा आता कोविडच्या गर्तेतून बाहेर पडला असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या पातळीत प्रवेशला आहे.


त्यामुळे ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अहमदनगरसह राज्यातील दहा जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णतः उठवले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांसह अन्य सर्व दुकाने, शॉपींग मॉल्स, चित्रपट गृहे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणे (मैदाने, फिरण्याच्या व सायकलिंगच्या जागा इ.), सर्व प्रकारची खासगी आस्थापने व कार्यालये, खासगी व शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती, खेळाची मैदाने व ठिकाणे, चित्रपट अथवा धारावाहिकांचे चित्रिकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न सोहळे, अंत्यविधी, बैठका व स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांच्या निवडी अथवा सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी, बंद असलेली बांधकामे, शेती विषयक सर्व कामकाज,


ई कॉमर्स अंतर्गत होणारे सर्व प्रकारचे व्यवहार, व्यायामशाळा, सलुनची दुकाने, ब्युटीपार्लर, स्पा व वेलनेस सेंटर्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहनचालक, मदतनीस आणि अन्य एक अशा तिघांच्या उपस्थितीत कार्गो वाहतूक, ई पासचा वापर करुन प्रवास, त्यासोबतच जीवनावश्यक व्यतिरीक्त असलेले सर्व प्रकारचे उत्पादन सुरु ठेवण्यास पहिल्या पातळीवरील दहा जिल्ह्यांना मोकळीत देण्यात आली आहे. या दहाही जिल्ह्यातील संचारबंदीसह जमावबंदीचे आदेशही मागे घेतले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियमित वेळेनुसार सुरु होणार असून वेळेबाबत राज्य सरकारकडून कोणतीही बंधने असणार नाहीत.


दुसर्‍या पातळीत हिंगोली आणि नंदूरबार या दोन जिल्ह्यांचा समावेश असून तेथील रुग्ण समोर येण्याची टक्केवारी पाच असून 25 ते 40 टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन खाटा व्यापलेल्या आहेत. तिसर्‍या पातळीत सर्वाधीक पंधरा जिल्ह्यांचा समावेश असून तेथील रुग्ण समोर येण्याची टक्केवारी 5 ते 10 च्या दरम्यान असून 40 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजन खाटांवर आहेत. त्यात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा व वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर रुग्ण समोर येण्याची गती 10 ते 20 टक्क्यांदरम्यान व 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असलेल्या चौथ्या पातळीत बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या पातळीवर 20 टक्क्यांपेक्षा अधिक गतीने रुग्ण समोर येणार्‍या व 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असणार्‍या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र सद्यस्थितीत या श्रेणीत राज्यातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.


1 जूनरोजी ऑक्सिजनच्या खाटा 50 टक्क्यांपेक्षा अधिक व्यापलेल्या अहमदनगर जिल्ह्याला कोणताही दिलासा देण्यात आलेला नव्हता. मात्र मागील सात दिवसांत त्यात अमुलाग्र बदल झाला असून जिल्ह्यातील 4 हजार 204 ऑक्सिजन खाटांपैकी 3 जूनरोजी केवळ 1 हजार 363 खाटांवर (24.48 टक्के) रुग्ण दाखल होते. तर 28 मे रोजी जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची सरासरी गती 5.26 टक्के, 29 मे रोजी 6.51 टक्के, 30 मे रोजी टक्के, 5.36 टक्के, 31 मे रोजी 3.54 टक्के, 1 जून रोजी 3.50 टक्के, 2 जूनरोजी 3.20 टक्के व 3 जूनरोजी 2.74 टक्के अशी आठवड्याची एकूण सरासरी 4.30 टक्के झाल्याने सुरुवातीला सर्वाधीक प्रादुर्भाव असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट झालेल्या अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आता सर्वात कमी प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *