घ्या आता! चंदनापुरीघाटात वाटमारीचा प्रकार मध्यरात्री आडवून दुचाकीस्वारास लुटले; तालुका पोलिसांकडून एकाला अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांनी सतत चर्चेत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्गावरुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत यापूर्वी केवळ वाहतुकीच्या कोंडीमूळे चर्चेत राहणार्‍या चंदनापुरी घाटात चक्क वाटमारीचा प्रकार घडला आहे. आजवर निर्धोक प्रवास करणार्‍या वाहतुकदारांच्या मनात धस्स करणारी ही घटना मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीवरुन साकूरफाट्याकडे निघालेल्या एका शेतकर्‍याला घाटातील अवघड वळणावर आडवून दोघांनी मारहाण केली. यावेळी त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून 20 हजारांच्या रोकडसह त्यांचा मोबाईल हिसकावून तेथून पोबारा केला. या घटनेनंतर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवताना त्यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले असून दुसरा मात्र पसार झाला आहे. या घटनेने गेल्याकाही दशकांपासून ‘वाटमारी’पासून मुक्त असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा गुन्हेगारांचे लक्ष वळू लागल्याचे दिसत आहे.


याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी (ता.14) पहाटे दीडच्या सुमारास चंदनापूरी घाटातील खिंडीजवळील वळणावर घडली. घटनास्थळापासून जवळच असलेल्या साकूरफाट्यावर राहणारे नितीन बाळासाहेब फटांगरे आपल्या मोटर सायकलवरुन घराकडे जात होते. खिंडीतील अवघड वळणावर दुचाकीची गती कमी होत असतानाच पाठीमागून विनाक्रमांकाच्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात आडवले. यावेळी त्यातील एकाने ‘आमच्या मोटर सायकलला कट का मारला?’ असे म्हणतं नाहक न घडलेला प्रसंग उभा करुन वाद घालण्यास सुरुवात केली. दुसर्‍याने शिवीगाळ करीत थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सुरुवातीला दहशत निर्माण केली.


त्यानंतर घाबरलेल्या ‘त्या’ शेतकर्‍याच्या गळ्याला चाकू लावून त्याच्या खिशातील 20 हजार रुपयांच्या रोकडसह त्यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. आपला कार्यभाग उरकताच दोन्ही चोरटे त्यांच्या दुचाकीवरुन सुसाट पसारही झाले. याबाबत तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.एस.सातपुते यांनी सूत्र फिरवताना तांत्रिक तपासाच्या आधारावर अनेक दशकानंतर महामार्गावरील चंदनापूरी घाटामध्ये वाटमारीचा प्रयत्न करणार्‍या दोघांमधील राहुल भारत सोनवणे (वय 22, रा.भराडवस्ती, अकोलेनाका, संगमनेर) याला अटक केली असून दुसर्‍याची ओळख स्पष्ट झाली असली तरीही तो पसार होण्यात यशस्वी ठरला आहे.


काही दशकांपूर्वी संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील कर्‍हे, चंदनापूरी, माहुली व बोटा खिंड आदी परिसरात वाहनधारकांना आडवून लुटण्याच्या घटना घडत असतं. त्यावेळी हा महामार्ग दुहेरी आणि तीव्र चढ-उताराचा असल्याने चोरट्यांना त्यांचा कार्यभाग सहज उरकता येत असायचा. मात्र गेल्या दोन दशकांत आणि त्यातही नूतनीकरणानंतर नाशिकपासून पुण्यापर्यंत कोठेही अशाप्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले नाही. अर्थात यासर्वांमध्ये महामार्गावरील पोलीस ठाणी आणि महामार्ग पोलिसांची सतर्कताही महत्वाची राहीली. मात्र या सर्वांना आता छेद देणारी घटना ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी घडली असून तालुका पोलिसांनी तातडीने तपास करुन एकाला अटकही केली आहे. मात्र त्यातून हा प्रकार थोपवला जाण्याची शक्यता कमी असून या घटनेतील आरोपींचा संबंध संगमनेरातील साई सूर्यवंशी टोळीशी जोडला जात असल्याने पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपास करुन या विचाराचे मूळ उखडण्याची गरज आहे.


गेल्याकाही कालावधीपासून अकोलेनाका परिसरात साई सूर्यवंशी या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या टोळीचे कारनामे वाढल्याने शहर पोलिसांनी एका प्रकरणात त्यातील बहुतेकांना गजाआड केले होते. मात्र त्यांच्यातील काहीजणांना जामिन झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरु झाल्या असून तब्बल दोन दशकानंतर वर्दळीच्या महामार्गावरील चंदनापूरी घाटात वाटमारीची घटना घडल्याने तालुका पोलिसांसह महामार्गावरील अन्य पोलीस ठाण्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Visits: 30 Today: 1 Total: 1442088

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *