जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर! जिल्ह्यात बारा गट व चोवीस गणांची संख्या वाढली; संगमनेर तालुक्यात एका गटासह दोन गणांची वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुदत संपलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समितीच्या गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्ह्यात 73 गटांसह एकूण 146 गण होते, मात्र राज्य सरकारने जानेवारीत जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला त्यापूर्वीच बजावलेल्या गट व गण रचनेचे आदेश मागे घेवून सुधारित आदेश बजवावे लागले. नव्या संरचनेनुसार आता जिल्ह्यात 85 गट तर 170 गण असणार आहेत. जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी वगळता उर्वरीत सर्व तालुक्यात ही संख्या वाढली असून संगमनेर तालुक्यात एका गटासह दोन गण नव्याने अस्तित्वात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी सन 2011 सालच्या ग्रामीण जनगणनेनुसार गट व गणांच्या रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना बजावले होते. परंतु, राज्य सरकारने 31 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाला सुधारित कच्चा आराखडा तयार करण्याचे पुन्हा आदेश द्यावे लागले. पूर्वीच्या आदेशानुसार कच्चा आराखडा सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारीची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतल्याने 10 मार्च रोजी आयोगाने त्याला स्थगिती दिली. आता त्याच टप्प्यापासून पुढे कार्यक्रम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी 2011 सालच्या जनगणनेचाच आधार घेतला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नव्याने बजावलेल्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गट व 170 गणरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत 12 गट व 24 गणांची संख्या वाढली आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील एका गटासह दोन गणांची नव्याने वाढ झाली आहे. मात्र अकोले व पाथर्डी या दोन तालुक्यांतील गट-गणांची संख्या जैसे थे असणार आहे, उर्वरीत तालुक्यांमध्ये ती वाढणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेची मुदत 20 मार्चला संपुष्टात आल्याने सध्या कार्यकारी अधिकार्‍यांकडे प्रशासकीय पदभार आहे, तर तत्पूर्वीच म्हणजे 14 मार्चरोजी पंचायत समितीची मुदत संपल्याने त्या-त्या ठिकाणचे गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.

यापूर्वी गट-गणांची रचना अंतिम होवून ती राजपत्रात प्रसिद्ध झाली की लागलीच आरक्षणाची सोडत काढण्याची पद्धत होती. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. पालिका निवडणुकांप्रमाणेच आरक्षणाचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गट व गण रचनेच्या कार्यक्रमात इतर मागास प्रवर्गाचा (ओबीसी) समावेश करण्यात आलेला नाही.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या गट-गण रचनेच्या कार्यक्रमानुसार 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी गट-गण रचना विभागीय आयुक्त सादर करतील. त्यांच्याकडून 31 मे पर्यंत त्याला मान्यता दिली जाईल. 2 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांकडून गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. 2 ते 6 जून या कालावधीत जिल्हाधिकार्‍यांकडे गट-गण रचनेबाबतच्या हरकती व सूचना दाखल करता येतील. जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केल्यानंतर 22 जूनरोजी गट-गण रचना अंतिम केली जाईल व 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम गट-गण रचना राजपत्रात प्रसिद्ध करतील. एकीकडे पालिकांसह जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या प्रभाग रचनांचे कार्यक्रम सुरु झाले असले तरीही प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्येच होण्याची दाट शक्यता आहे.


तालुकानिहाय जिल्ह्यातील गट-गणांची संख्या :
सन 2017-18 पूर्वी जिल्हा परिषदेचे 75 गट व 150 गण होते. त्यानंतर सदस्य संख्या कमी होवून अनुक्रमे ही संख्या 73 व 146 वर आली. आता राज्य सरकारने त्यात पुन्हा वाढ केल्याने आगामी पाच वर्षांसाठी जिल्ह्यात 85 गट व 170 गण अस्तित्वात असतील. जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी वगळता इतर सर्व तालुक्यातील गट-गणांची संख्या वाढली आहे. जिल्हा परिषदेची तालुकानिहाय गट व गण संख्या पुढीलप्रमाणे : अकोले 6 गट, 12 गण, संगमनेर 10 गट, 20 गण, कोपरगाव 7 गट, 14 गण, राहाता 6 गट, 12 गण, श्रीरामपूर 5 गट, 10 गण, नेवासा 8 गट, 16 गण, शेवगाव 5 गट, 10 गण, नगर तालुका 7 गट, 14 गण, राहुरी 6 गट, 12 गण, पारनेर 6 गट, 12 गण, श्रीगोंदा 7 गट, 14 गण, कर्जत 5 गट, 10 गण व जामखेड 3 गट व 6 गण अशा प्रकारची रचना अस्तित्वात येणार आहे.

Visits: 32 Today: 2 Total: 115017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *