नगर-मनमाड महामार्गावर अपघात चिमुकलीचा मृत्यू; झरेकाठीवर शोककळा

नायक वृत्तसेवा, आश्वी 
नगर-मनमाड महामार्गावर राहाता तालुक्यातील अस्तगाव माथा येथे झालेल्या अपघातात संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील एका चिमुकलीचा मृत्यू झाला. अनन्या चव्हाण असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण झरेकाठी गावावर शोककळा पसरली आहे.
झरेकाठी  येथील विट उत्पादक अनिल चव्हाण आपल्या कुटुंबासह  ओंकारेश्वर दर्शनासाठी गेले होते.दर्शन आटोपून ते परत येत असताना राहाता तालुक्यातील अस्तगाव माथा येथे सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला.हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा दरवाजा जोरात आपटून उघडला. त्याच क्षणी अनण्या चव्हाण ही बाहेर फेकली गेली. काही सेकंदांत दरवाजा पुन्हा आपटून बंद झाला, त्यामुळे उर्वरित प्रवासी वाहनात सुरक्षित राहिले. मात्र या दुर्दैवी अपघातात चिमुकलीला प्राण गमवावे लागले. तिच्यावर शोकाकुल वातावरणात सोमवारी दुपारी झरेकाठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 अनन्या लोणीच्या कन्या विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. तिचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी होता. निरागस हसरा चेहरा, मनमिळावू वृत्तीमुळे ती शाळेत व गावात सर्वांची लाडकी होती.कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणींसह आनंदाने बागडणाऱ्या अनन्याच्या मृत्यूने कुटुंबावर आकाश कोसळले आहे.  

Visits: 190 Today: 1 Total: 1100723

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *