महिलांच्या स्वच्छतागृहासमोरच गोदामाचे दार काढण्याचा घाट! चव्हाणपूरा परिसरातील असंवेदनशील कारखानदाराच्या कृतीने महिलांमध्ये मात्र संताप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध कारणांनी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या घटत असतांना अस्तित्त्वात आहे त्या संसाधनगृहांना आता काही महत्त्वकांक्षी व्यापारी जाणीवपूर्वक आडकाठी निर्माण करीत आहेत. अशाच प्रकारातून अशोक चौकातील सार्वजनिक मुतारी रातोरात तर नवीन नगर रस्त्यावरील दिवसाढवळ्या ‘गायब’ करण्यात आली होती, अर्थात हे दोन्ही प्रयोग पालिकेने अधिकृतपणे केले, मात्र त्यामागे अदृष्य शक्तिचा हात होता हे वेगळे सांगायला नको. आता असाच काहीसा प्रकार चव्हाणपूरा परिसरातील महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत घडू लागला आहे. तेथील एका कारखानदाराने असंवेदनशीलपणे चक्क महिलांच्या स्वच्छतागृहा समोरच गोदामाचे भलेमोठे प्रवेशद्वार काढण्याचा घाट घातल्याने तेथील स्वच्छतागृहात जाणार्‍या महिलांना संकोच निर्माण झाला आहे. पालिकेने तातडीने या समस्येकडे लक्ष देवून संबंधित कारखानदाराचा ‘तो’ उद्योग थांबवावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. गेल्या दिड दशकांपासून महिला नेतृत्त्व लाभलेली पालिका या समस्येवर काय तोडगा काढते याकडे आता या परिसरातील असंख्य महिलांचे लक्ष्य लागले आहे.


गोरगरीब, विणकर, विडी कामगार, मजूर व कष्टकरी रहिवाशांचा मोठा भरणा असलेल्या रंगारगल्ली, चव्हाणपूरा, साळीवाडा, जेधे कॉलनी, हिरे मळा, काठे मळा या भागातील नागरिकांसाठी आणि विशेष करुन महिलांसाठी संगमनेर नगरपालिकेने चव्हाणपूर्‍याच्या मागील बाजूस म्हाळुंगी नदीच्या काठावर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहेत. येथील स्वच्छतागृह गेल्या अनेक दशकांपासून असल्याने त्याबाबत कोणाची तक्रार असण्याचेही कोणतेही कारण नाही. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी ‘स्वच्छ शहर’ मोहिमेच्या अंतर्गत येथील स्वच्छतागृहाचे रुपडे पालटविले. आकर्षक रंगरंगोटी, पाण्याची मुबलक व्यवस्था, स्वच्छता यामुळे या परिसरातील दुर्गंधी जवळपास नष्ट झाली व महिलांचीही मोठी सोय झाली.


मात्र आता त्या परिसरातील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या मालकाने वेगळाच घाट घालीत महिलांच्या या स्वच्छतागृहाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी अन्य पर्याय सोडून या महाशयांनी चक्क महिलांच्या स्वच्छता गृहासमोरच आपल्या बंद कारखान्याच्या मागील बाजूने भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले आहे. या बंद पडलेल्या कारखान्याचा वापर आता गोदामासाठी करण्याचा निर्णय ‘त्या’ व्यापार्‍याने घेतला आहे. त्यासाठी नेमके त्याने महिलांच्या स्वच्छतागृहात जाण्याच्या दारासमोरच आपल्या बंद कारखान्याच्या भिंतीतून दरवाजा काढण्याचे काम सुरु केले आहे. त्याची ही कृती महिलांमध्ये संकोच निर्माण करणारी आहे.


सदर गोदाम अस्तित्त्वात आल्यानंतर तेथे दररोज ठिकठिकाणाहून येणार्‍या मालगाड्या खाली केल्या जातील, माल घेवून आलेली वाहनेही महिला स्वच्छता गृहासमोरच तासन् तास उभी राहतील व दिवसभर माणसांची व वाहनांची वर्दळ सुरु राहील्याने महिलांना स्वच्छतागृहात जाण्यास संकोच निर्माण होईल. त्यामुळे सदर व्यापार्‍याने स्वच्छतागृहाच्या समोरील भिंत तोडण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक महिलांनी संतापही व्यक्त केला, मात्र त्याचा कोणताही परिणाम संबंधित व्यापार्‍यावर झालेला नाही. त्यामुळे आता ऐतिहासिक नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा असलेल्या दुर्गा तांबे यांनीच यासाठी पुढाकार घ्यावा आणि महिलांची होणारी संभाव्य कुचंबना थांबवावी अशी मागणी वरील परिसरातील महिलांकडून करण्यात येत आहे.


संगमनेर शहराची व्यापार पेठे जिल्ह्यातील समृद्ध असलेल्या पेठांमध्ये गणली जाते. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांसह आसपासच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिक, व्यापारी यांची मोठी वर्दळ संगमनेरात असते. बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांसाठी शहरात स्वच्छतागृहे व मुतार्‍यांची वाणवा आहे. शहराच्या गावठाणातील काही ठराविक ठिकाणी पालिकेनेच पूर्वी निर्माण केलेली स्वच्छतागृहे व मुतार्‍या आहेत, मात्र काही ठिकाणच्या महत्त्वकांक्षी व्यापार्‍यांनी आपल्याला त्रास नको म्हणून राजकीय धुरिणांना हाताशी धरुन अशा अनेक मुतार्‍या आणि स्वच्छतागृह नामशेष करुन टाकले आहेत.


वाणगीदाखल घ्यायचेच ठरल्यास अशोक चौक, जूने पोस्ट कार्यालय, पालिकेचे प्रवेशद्वार, नवीन नगर रोड, बाजारपेठ, लालाजी चौक या भागात पूर्वी असलेल्या पुरुषांसाठीच्या मुतार्‍या राजकीय दडपणातून रातोरात गायब झाल्या आहेत. बागवानपूर्‍यातील सार्वजनिक शौचालयही गेल्या पंधरवड्यात पाडण्यात आले. त्यामुळे बाहेरगावाहुन येणार्‍या पुरुषांना नैसर्गिक विधींसाठी मोठी अडचण होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यातही संगमनेर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची कल्पनाच गैर असल्यागत अवस्था आहे. त्यामुळे आहे त्या वास्तुंचे जतन आणि संवर्धन करुन महिलांची अडचण दूर करण्यासाठीचे प्रयत्न व्यापक होण्याची गरज आहे. चव्हाणपूर्‍यातील स्वच्छतागृहाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या भागात गोदाम आणि वाहनांची वर्दळ वाढल्यास त्याचा परिणाम तेथील स्वच्छतागृहात जाणार्‍या महिलांच्या मानसिकतेवर होण्याचीही शक्यता आहे.


पालिकेने सार्वजनिक हित लक्षात घेवून महिलांची कुचंबना होणार नाही, त्यांच्या मनात संकोत निर्माण होणार नाही यासाठी आहे त्या संसाधनगृहांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित व्यापार्‍याला महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समोरच आपल्या व्यावसायिक गोदामाचे दार काढण्यापासून रोखण्याची गरज आहे, अन्यथा सदरचे स्वच्छतागृहही काही दिवसांत अचानक गायब होईल व स्वच्छ संगमनेरच्या स्वप्नांना आपोआप हरताळ फासला जाईल याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.


महिलांना चोवीस तास वापरता यावे यासाठी चव्हाणपूर्‍यातील स्वच्छतागृहात स्वच्छता आणि पाण्यासोबतच वीजेचीही व्यवस्था आहे. येथील वातावरण अजूनतरी महिलांसाठी सुरक्षित असल्याने या स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी महिला निर्भयतेने येतात. मात्र सदरचे गोदाम सुरु झाल्यास तेथे माणसांची आणि वाहनांची वर्दळ वाढेल. त्याचा थेट परिणाम महिलांच्या मानसिकतेवर होण्यासोबतच बाहेरगावाहुन येणार्‍या अशा व्यक्तिंकडून एखादी गंभीर घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. पालिकेने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1416497

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *