शेतकर्यांना भारनियमनमुक्त करा; भाजपा किसान मोर्चाची मागणी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकर्यांना महावितरणने भारनियमनमुक्त करावे; अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा भारतीय जनता पक्ष संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे व भाजप किसान मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे यांनी दिला आहे. याबाबत महावितरणचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देत शेतकर्यांच्या व्यथा मांडत आधिकार्यांना धारेवर धरले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या उष्णतेची तीव्रता वाढत आहे. भाजीपाला, धान्य पिके, ऊस, चारा पिके यांना उष्णतेमुळे पाण्याची आवश्यकता वाढली आहे. पंरतु महावितरण कंपनीच्या अनाठायी कारभारामुळे शेतीमालाची अक्षरशः राख होत आहे. शेतकर्यांना पाणी असूनही उभे पीक डोळ्यासमोर जळून जाताना पाहावे लागत आहे. महावितरण कंपनीने भारनियमन वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. आठ तास वीज पुरवठा हा फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्ष मात्र चार ते पाच तासच वापरायला भेटते. त्यातही कमी अधिक दाबाने वीज पुरवठा केला जातो. अनेक शेतकर्यांच्या पाणी वाटपाच्या बारी पद्धतीने पाणी भरावे लागते, त्यावर याचा परिणाम होत आहे. जर वेळापत्रकानुसार एखाद्या शेतकर्याचे एक दोन दिवस वाया गेले तर पुन्हा बारी येईपर्यंत वाट पाहत बसावे लागते, त़ोपर्यंत शेतमाल उष्णतेच्या तीव्रतेमुळे जळून जात आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे.

भाजप तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे म्हणाले, भारनियमनामुळे शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. छोटे-मोठे व्यापारी यांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसत आहे. हा अनागोंदी कारभार त्वरीत बंद करावा. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल अशी तंबी दिली आहे. भाजप किसान मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे यांनी महावितरणच्या अधिकार्यांसमोर शेतकर्यांची अवस्था काय असते याची कैफीयत मांडली. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत कधीही शेतकर्यांना भारनियमनाचा त्रास झाला नाही. कुणाचेही वीज जोडणी तोडली नाही. पंरतु या महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांची वीज तोडली जाते, शेतकर्यांना वर्गणी गोळा करून रोहित्राचा खर्च करावा लागतो, वीज पुरवठा चार ते पाच तासच वापराला जातो आणि बिल मात्र चोवीस तासांचे आकारले जाते हा अनाठायी कारभार थांबला पाहिजे. अन्यथा भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, ज्येष्ठ नेते राम जाजू, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, अभियांत्रिकी सेल जिल्हा अध्यक्ष हरीश चकोर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आरती पठाडे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, रोहिदास साबळे, विनायक थोरात, वाल्मिक शिंदे, केशव दवंगे, विकास गुळवे, कल्पेश पोगुल, माधव थोरात, महेश मांडेकर, कचरू वारुंक्षे, संजय वाकचौरे, शिवाजी आहेर, संजय गिते, अशोक वाकचौरे, गणेश सानप आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
