मला आमदार करण्यात पत्रकारांचेही मोठे योगदान : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
पत्रकार हा जनसामान्य माणसाचा आधारस्तंभ आहे. माझ्या सामाजिक, राजकीय जीवनामध्ये पत्रकारांचा सहभाग महत्त्वाचा असून मला आमदार करण्यात पत्रकारांचेही मोठे योगदान असल्याचे सांगत पत्रकारांचे कर्तव्य जरी समाजासाठी असले तरी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांचे  कुटुंब हे माझे कुटुंब आहे, असे समजून कायमस्वरूपी पत्रकारांच्या पाठी मागे भक्कमपणे उभा राहणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या संगमनेर तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने शहरातील अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, खजिनदार गोरक्षनाथ नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, सचिव सचिन जंत्रे, कार्याध्यक्ष भारत रेघाटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे, संजय अहिरे संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.खताळ पुढे म्हणाले की, संगमनेर मधील पत्रकारांची आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे.  त्यांनी मला येथून मागेही खूप मदत केली आहे. आणि येथून  पुढेही ते नक्कीच मदत करतील अशी मला आशा आहे.  त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी प्रत्येक वर्षी  त्यांच्या मुलांना  शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे आ.अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या कुटुंबातील मुलं ही समाजाच्या सक्षम भवितव्यासाठीची बीज आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे  जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी सांगितले. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, सामाजिक काम करतांना त्यांच्याकडे आपल्या कुटुंबाला देण्यासाठी फारसा वेळ नसतो. पत्रकारांनी  मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी  कौटुंबिक जबाबदारी  पार पाडावी असे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू यावेळी म्हणाले.
पत्रकारांनी साहित्य वाटपाच्या अनेक बातम्या आपल्या दैनिकातून प्रसिद्ध केल्या परंतु त्यांच्या पाल्यांना आत्तापर्यंत शैक्षणिक साहित्य कुणीही दिले नाही मात्र आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे जिल्हा खजिनदार गोरक्ष नेहे आणि सदस्य संजय अहिरे यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे आभार जेष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी मानले.
संगमनेर शहरात पत्रकार भवन व्हावे, यासाठी यापूर्वीच आपण आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.मात्र आता जागेचा प्रश्न बाकी राहिला आहे. दोन ठिकाणी जागा  उपलब्ध आहे, त्यातील एक जागा पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश आपण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असून पत्रकार भवन लवकरात लवकर उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही आमदार अमोल खताळ यावेळी म्हणाले. 
Visits: 37 Today: 2 Total: 638025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *