… अन्यथा संचालक मंडळासह राजीनामाच देतो ः खा.डॉ.विखे
नायक वृत्तसेवा, राहुरी
लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार डॉ.सुजय विखे यांचा विजय सुकर करण्यास कारणीभूत ठरणार्या राहुरीतील डॉ.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी संपायला तयार नाहीत. कर्जपुरठा आणि अन्य प्रश्न सोडवून गाळप हंगाम सुरू केला खरा पण त्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. कारखाना वारंवार बंद का पडतो, याची पाहणी करण्यासाठी विखे गेले असता बॉयलरमध्ये चक्क साखरेची पोती आढळून आली. हा खोडसाळपणा पाहून विखे संतापले आणि 72 तासांत कारभार सुधारला नाही तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ अशी घोषणाच त्यांनी केली.
राहुरी येथील हा कारखाना विविध कारणांमुळे बंद पडला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ.विखे यांनी त्यामध्ये लक्ष घातले. कामगारांचे प्रश्न सोडविले, जिल्हा सहकारी बँकेत विरोधकांशी जुळवून घेत कर्ज मिळवून दिले. निवडणुकीत लक्ष घालून आपले मंडळ निवडून आणले. बंद पडलेला कारखाना सुरू झाला. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांना राहुरी तालुक्यात चांगला फायदा झाला. त्यानंतरही विखे यांनी हा कारखाना सुरळीत चालू ठेवण्यावर भर दिला. पदाधिकार्यांमध्ये अवश्यक ते बदल केले. स्वत: विखे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत.
यावर्षीही कारखाना सुरू झाला आहे. मात्र, वारंवार व्यत्यय येऊन गाळप बंद पडून नुकसान होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यावेळी याचा फटका बसू शकतो. शिवाय विखे यांनी लोकसभा निवडणुकीपुरतेच लक्ष घातले होते, असे आरोपही मधल्या काळात होऊ लागला होता. त्यामुळेच नेमकी काय अडचण होत आहे, याची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली. पदाधिकारी आणि कामगारांची बैठक घेतली. त्यानंतर बॉयलरमध्ये त्यांना साखरेची पोती आढळून आली. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुळीच होऊ शकत नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशाराच खासदार विखे यांनी दिला आहे. एवढे प्रयत्न करूनही कारखाना सुरळीत चालत नसल्याने विखे यांचा हा संताप झाल्याचे पहायला मिळाले.