संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या पारड्यात? ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाचा उमेदवार; भाजपकडून मात्र दोन डझन इच्छुक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात प्रदीर्घकाळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात या निवडणुका महायुती व महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवल्या जातील की स्वतंत्रपणे याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार सुकाणू समितीकडून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरु असून नगराध्यक्षपदाची जागा भाजप लढवणार असल्याचे गृहीत धरुन शहरातील जवळपास दोन डझन इच्छुकांनी उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. मात्र या उपरांतही संगमनेरात आता नव्या चर्चेला पाय फूटले असून ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाचा उमेदवार’ या तत्वानुसार संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे बोलले जावू लागले आहे. त्यातून संगमनेरच्या स्थानिक निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून विधानसभेप्रमाणेच भाजपमधून उमेदवाराची निर्यात होणार की नवा चेहरा समोर येणार यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बंपर यशामुळे मनसुबे उंचावलेल्या महायुतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात की स्वतंत्रपणे याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र त्याचवेळी
मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी परिस्थितीनुरुप स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सुतोवाचही केले होते. स्थानिक निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींनाही स्वबळ वाढवण्याची संधी असल्याने ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षालाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याबाबत ढोबळ चर्चा झाल्याचेही कानावर आले होते. प्रत्यक्षात मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 4 नोव्हेंबररोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये महायुतीच्या एकत्रित सुकाणू समित्यांची स्थापना करुन नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात केली होती.

संगमनेरातही आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने गेल्या आठवडाभर भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेत त्यातील प्रभावी उमेदवारांची नावे सिलबंद लिफाफ्यातून वरीष्ठांकडे पाठवली आहेत. मात्र त्याचवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे असल्याने नगराध्यक्षपदाची जागा भाजपकडे जाईल असे मानून
संगमनेरच्या पालिका विरोधीगटातील बहुतेक सर्वच इच्छुकांनी भाजप कार्यकर्ता म्हणून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यातून भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे, पत्रकार स्मिता गुणे, रेखा गलांडे, उषा नावंदर, माजी नगरसेविका सुषमा तवरेज, ज्योती भोर, प्रा.एस.झेड्.देशमुख यांच्या कन्या सुजाता देशमुख या प्रमुख नावांसह तब्बल दोन डझन महिलांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली.

इच्छुकांची संख्या आणि त्यातील प्रभावी उमेदवार यावरुन महायुतीमधील चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपकडून पायल ताजणे अथवा स्मिता गुणे यांच्यातील एका नावावर एकमत होईल अशी चिन्हे दिसत असतानाच आता अचानक संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातून गेला आठवडाभर तासन् तास
ताटकळून भाजपच्या उमेदवारीचा अट्टाहास करणार्या इच्छुक महिलांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. त्यातही संगमनेरची जागा भाजपकडेच राहणार असे मनोमन मानून सुरुवातीपासूनच भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आटापीटा करणार्यांना आता ऐनवेळी त्यावर पाणी सोडावे लागण्याची वेळ आल्याची चर्चा असल्याने त्यांच्याकडून विधानसभेच्या धर्तीवर शिवसेना पक्षप्रवेश होण्याचीही शक्यता आहे.

विकासाचा आराखडा समोर ठेवून पक्षीय अभिनिवेश टाळून यंदा राज्यात काही ठिकाणी पक्षविरहित शहर विकास आघाडीचे सूत्र आकाराला येत असल्याचीही काही उदाहरणे समोर येत आहेत. त्यात संगमनेर शहराचाही समावेश असून आमदार सत्यजीत तांबे यांनी अशा प्रकारच्या आघाडीची रचना करुन शहरातील जुन्या-नव्यांचा मेळ घालीत निवडणुकीची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते याबाबत शहरात एकीकडे
मोठी उत्सुकता निर्माण झालेली असताना दुसरीकडे ऐनवेळी महायुतीकडून भाजप की शिवसेना? अशी नवीनच चर्चा समोर येवू लागल्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातून विधानसभेप्रमाणे भाजपमधूनच उमेदवाराची निर्यात होते की, शिवसेनेकडून नवा चेहरा समोर आणला जातो यावरुनही आता चर्चेचे फड रंगात येवू लागले आहेत.

