शिर्डी मतदार संघात नवीन उद्योगांच्या संधी वाढणार! खा.वाकचौरे व पोखरकर यांची सकारात्मक चर्चा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सल्लागार संदीप पोखरकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदार संघात नवीन उद्योगधंद्यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती कशी करता येईल यावर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली.या भेटी दरम्यान कामगार आयुक्त रेवननाथ भिसले, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अधिकारी प्रफुल्ल रहाणे, हेमंत भंडारी, मुकुल कुलकर्णी, आशिष शिंदे उपस्थित होते.

या बैठकीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, स्थलांतर थांबवावे आणि ग्रामीण भागातही उद्योगांची चळवळ निर्माण व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोखरकर यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अनुदान योजना, स्टार्टअप प्रोत्साहन योजना, तसेच पीएमईजीपी, एससी – एसटी हब, एमएसई – सी डी पी, सीजीटी एमएसई, यांसारख्या योजनांबद्दल माहिती दिली. तसेच या योजनांमधून महिलांना देखील कर्ज, प्रशिक्षण, मार्केटिंग सपोर्ट मिळू शकतो.त्यामुळे महिला उद्योजक घडवण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, संदीप पोखरकर हे एक अधिकारी असून, सध्या केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांचे सल्लागार म्हणून जबाबदारीने काम पाहत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात बेरोजगारी कमी करणे आणि स्थानिक युवकांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करून मोठ्या प्रमाणात उद्योग, लघुउद्योग आणि उद्यमशीलता वाढवण्याचा मानस आहे.मंत्रालयामार्फत आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन पुरवले जाईल. योग्य प्रकल्प अहवाल आणि स्थानिक गरजांनुसार कंपन्या व प्रकल्प आणण्यास प्राधान्य दिलं जाईल असे आश्वासन पोखरकर यांनी दिले.या भेटीमुळे शिर्डीमधील नागरिकांमध्ये आशा आणि उत्साह निर्माण झाला असून तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

या सकारात्मक चर्चेमुळे मतदारसंघात रोजगार, उद्योजकता आणि महिला सशक्तीकरण या तीन प्रमुख क्षेत्रांना नवे बळ मिळणार आहे. मतदारसंघात लवकरच यासंदर्भात उद्योग मेळावे, प्रशिक्षण कार्यशाळा व माहिती सत्रे आयोजित केली जाणार असल्याची माहितीही बैठकी दरम्यान देण्यात आली.

Visits: 162 Today: 3 Total: 1107427
