तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही पडली वाढती भर..! मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी, मात्र नवीन गावांमध्ये संक्रमण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपेक्षेप्रमाणे दीपावलीनंतर तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ होण्याचा जाणकारांचा अंदाज खरा होतांना दिसत असून मंगळवारी चालू महिन्यातील सर्वोच्च ठरलेल्या रुग्णसंख्येचा धक्का बसल्यानंतर आजही एकप्रकारे त्याची पुनरावृत्तीच बघायला मिळाली आहे. खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या निष्कर्षातून आजही तालुक्यातून 39 रुग्ण समोर आले असून आठ दिवसांतच तालुक्यातील रुग्णसंख्येने 234 रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसर्या दिवशी समोर आलेल्या वाढीव रुग्णसंख्येने तालुक्याचा प्रवास पाच हजाराच्या दिशेने पुढे सरकत 4 हजार 746 वर जावून पोहोचला आहे.
पाश्चात्य देशांमध्ये भारतापूर्वीच कोविडचा प्रवेश झाला होता. त्यामुळे अशा अनेक देशांमध्ये संक्रमणाने ठराविक उंची गाठल्यानंतर तेथील संक्रमितांमध्ये घट होवून एकप्रकारे कोविडचा प्रादुर्भाव थांबल्याचे चित्र दिसत होते. भारतातही जुलै ते सप्टेंबर हा काळ रुग्णसंख्येची उंची शिखरावर नेणारा ठरला. मात्र गेल्या महिन्यापासून देशातील विविध राज्यांमधून कोविडचे दररोज येणारे आकडे घटू लागले व देशातील संक्रमणाला ओहोटी लागल्याचे वातावरण दिसत असतांना दिल्लीत कोविडच्या दुसर्या लाटेने देशवासियांच्या चिंता वाढवल्या असून दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्यासारखी स्थिती निर्माण होवू पाहत आहे.
महाराष्ट्रातही दिवाळीनंतर कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचे अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविले होते. नोव्हेंबरच्या अगदी पहिल्या दिवसापासून संक्रमणात एकसारखी घट नोंदविली गेल्याने राज्यातील कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असल्याचे चित्रही निर्माण झाले होते. मात्र दिवाळीला अनपेक्षितपणे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये अक्षरशः झुंबड उडविल्याने त्याचा परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली असून मंगळवारी (ता.17) तब्बल 56 रुग्णांचा धक्का देणार्या कोविडने सलग दुसर्या दिवशीही चढीचा सिलसिला कायम ठेवला आहे.
मंगळवारी शहरात 12 रुग्ण समोर आले होते. त्यात आज घट होवून शहराच्या बाधित क्षेत्रासह अन्य भागातून आठ रुग्ण समोर आले. तर तालुक्यात काल 44 रुग्ण समोर आले होते, त्यातही काहीशी घट होत आज 31 रुग्ण समोर आले. आजच्या एकूण 39 रुग्ण संख्येने तालुक्याचा बाधितांच्या संख्येचा प्रवास पाच हजाराच्या दिशेने सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणार्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कोविडचे संक्रमण पुन्हा एकदा गती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज शहरात बाधित आढळलेल्यांं मध्ये कोल्हेवाडी रोड वरील पंधरा वर्षीय तरुणी, विद्यानगर येथील 33 वर्षीय तरुण, शिवाजीनगर परिसरातील 71 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, गणेश नगर परिसरातील 23 वर्षीय तरुण, ताजणे मळा भागातील 37 वर्षीय महिला व सागर कॉम्प्लेक्स मधील 41 वर्षीय तरुण. त्यासोबतच केवळ संगमनेर असा पत्ता दिलेल्या 50 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील संक्रमणात आज काहीशी घट झाल्याचे दिसून आले. मात्र आज ज्या भागातून रुग्ण समोर आले त्यात बहुतांशी नवीन गावांचा समावेश आहे ही गोष्ट चिंताजनक आहे.
ग्रामीण भागात आज आश्वी खुर्द येथील 59 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 58 व 45 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण व 23 वर्षीय महिला, निमगाव खुर्द मधील 73 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 39 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, आंबी खालसा येथील 26 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 55 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 48 वर्षे इसम व 23 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळी येथील 32 वर्षीय तरुण, मांंची हिल येथील 57 वर्षीय इसमासह 33 वर्षीय तरुण, 52 वर्षीय महिला व पाच वर्षीय बालक, नान्नज दुमाला येथील 39 वर्षीय तरुणासह अकरा वर्षीय बालिका,
कनोली येथील 61 व 52 वर्षीय इसम, जोर्वे येथील 56 वर्षीय इसम, चनेगाव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तळेगाव दिघे येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारा दुमाला येथील 66 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 56 वर्षीय महिला व निमोण येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 4 हजार 746 वर पोहोचली आहे. दिवाळीच्या निमित्ताने फुललेल्या बाजारपेठा आणि त्यात नागरिकांनी कोविड प्रादुर्भावाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संपुष्टात येऊ पाहणारा तालुक्यातील कोविडचा संसर्ग पुन्हा डोके वर काढू लागल्याने प्रशासनासह वैद्यकीय क्षेत्राच्या चिंता वाढल्या आहेत.