संगमनेरात लाल चिखल! दर कोसळल्याने टोमॅटो रस्त्याव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मार्च-एप्रिलमध्ये तीव्र उन्हाळा व मे महिन्यात सलग १५ दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बागायती फळभाज्यांनाही त्याचा फटका बसला. परिणामी भाजीपाल्याची गुणवत्ता ढासळल्याने दर कोसळले आहेत. जास्त फटका टोमॅटोला बसला आहे. अतिपावसाने टोमॅटोचा रंग बदलल्याने बाजारात दर कोसळले. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना शेतातील टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहेत.

तीन महिन्यात शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. किलोला १८० ते २०० रुपयांप्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता कवडीमोल भाव आला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला १० ते १५ रुपये किलो असा दर मिळत आहे. होलसेल मध्ये पाच ते आठ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी या दिवसात सरासरी १२०० ते २००० रुपये प्रतिक्रेट दराने टोमॅटो विकला गेला होता. यावर्षी
टॉमेटो १०० ते ३०० रुपये प्रतिक्रेटवर आला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. यामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून डोक्याला हात मारून घेतला आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 1100112
