वृंदावन कृषी महाविद्यालयाचा प्लास्टिक मुक्तीचा नारा! शिवनेरी किल्ल्यावर राबवली स्वच्छता मोहीम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गड किल्ले ही राष्ट्राची संपत्ती असून भावी पिढ्यांसाठी स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, म्हणून वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत त्यांनी किल्ला परिसरातील कचऱ्यासह प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.

डॉ.आर.एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी शिवनेरी परिसरात स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिक मुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते हे पटवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी प्लास्टिक दूर करू या.. पर्यावरण वाचवू या, कापडी पिशवी घरोघरी.. पर्यावरणाचे रक्षण करी, प्लास्टिकमुक्त पर्यटन, स्वच्छ किल्ला.. सुंदर किल्ला अशा घोषणा देत किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांचे प्लास्टिक मुक्ती बाबत प्रबोधन केले. संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. योगेश एखंडे, प्रा. डॉ. जयसिंग लामटूळे, प्रा. डॉ. अनंता महाले, प्रा. डॉ. नितीन परजणे प्रा. आशिष सहाणे, प्रा. पूजा हापसे, प्रा. प्रतीक्षा गरजे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम यशस्वीरित्या राबविली गेली.

Visits: 160 Today: 1 Total: 1101413
