कायम शिकत राहणं ही पत्रकाराची खरी भूमिका : सुनील माळी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पत्रकाराला फक्त बातमी लिहिता येणं पुरेसं नाही,त्याला बातमीतलं तंत्र आणि मंत्र समजलं पाहिजे.’तंत्र’ म्हणजे समाजापर्यंत पोहोचण्याची पद्धत.’मंत्र’ म्हणजे बातमी मिळवण्याच कौशल्यं.पत्रकार मित्रासारखा असेलच, पण तो मित्रापेक्षा वेगळं, विशेष कौशल्य देणारा असायला हवा.कायम शिकत राहणं ही पत्रकाराची खरी भूमिका असते असे  मत ज्येष्ठ संपादक सुनील माळी यांनी व्यक्त केले.
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने आत्मा मालिक पावन भूमीमध्ये आयोजित  राज्यस्तरीय कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करतांना माळी बोलत होते. ते पुढे म्हणाले की,  पत्रकार म्हणजे केवळ बातमी पोहोचवणारा नव्हे, तर ती साठवणे, शोधणे, सादर करणे आणि तिच्या माध्यमातून समाजावर परिणाम घडवणे हे त्याचे काम असते. यासाठी दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत तंत्र आणि मंत्र.तंत्र म्हणजे बातमी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची पद्धत. यात लेखनशैली, माध्यमांची निवड, प्रस्तुतीकरणाचे कौशल्य, शीर्षक,नेमकेपणा, फोटो वा व्हिडीओचा वापर यांचा समावेश होतो. तर, मंत्र म्हणजे बातमी कशी मिळवायची, कोणत्या मार्गाने माहिती शोधायची, स्रोत टिकवायचे, विश्वासार्हता जपायची याचे कौशल्य.पत्रकाराने सतत शिकत राहिले पाहिजे. शास्त्रीय दृष्टिकोनातून पत्रकारिता समजून घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीस शास्त्र असते, मग ती बातमी असो, तिचा इंट्रो, लीड, वा अग्रभाग. हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी असले पाहिजे. बातमीत नेहमीच नवीन आणि आकर्षक मुद्दा असावा, जो वाचकाचे लक्ष वेधून घेईल.
बातमीचे सहा अग्रप्रकार ओळखून त्याचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे.प्रश्नार्थक, अवतरणात्मक, स्पष्टीकरणात्मक, वर्णनात्मक, सारांश रूप,वैशिष्ट्यपूर्ण या सगळ्या प्रकारांची योग्य वेळ आणि संदर्भात वापर केल्यास बातमी अधिक प्रभावी होते. मात्र, लघुतेचा अतिरेक टाळावा. शैलीत वैविध्य असले तरी अनाठायी भाषेपासून दूर राहावे.आजच्या काळात केवळ मराठीच्याच आग्रहाने चालणार नाही. नव्या माध्यमांचे (डिजिटल, सोशल मीडिया, व्हिज्युअल प्लॅटफॉर्म्स) आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही संपादक सुनील माळी यांनी यावेळी स्पष्ट केले.
Visits: 241 Today: 1 Total: 1954441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *