के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत सर्व पक्षांनी एकत्र लढा उभारावा ः तनपुरे
के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत सर्व पक्षांनी एकत्र लढा उभारावा ः तनपुरे
राहुरी कृषी विद्यापीठातील आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण
नायक वृत्तसेवा, राहुरी
के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर व पारनेरच्या शेतकर्यांना सांगितले.
के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी (ता.19) राहुरी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात के. के. रेंजच्या विस्तारीकरण क्षेत्रातील गावांत सैन्य दलाचे अधिकारी सर्वेक्षण करीत आहे. सामान्य नागरिकांत जमिनीच्या अधिग्रहणाबाबत संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नावर माझ्यासह आमदार नीलेश लंके, धनराज गाडे तीव्र विरोध करू. संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची मंगळवारी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते शनिवारी भेटणार आहेत. खासदार डॉ.सुजय विखे यांनी या प्रश्नाबाबत भाजपच्या काही नेत्यांना घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतल्याचे माध्यमातून समजले. आपणही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिला आहे, असे तनपुरे यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.