डिवायएसपी संदीप मिटके यांचा वेश्या व्यवसायावर छापा! शेतात सुरु होता उद्योग; एकाला अटक तर, तीन पीडित मुलींची सुटका..
नायक वृत्तसेवा, राहुरी
गेल्या अर्ध दशकापासून जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी पेलण्यासह महत्वाच्या कारवायांचे नेतृत्त्व करणार्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे. वांबोरीतून नगरच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरील गुंजाळे शिवारातील एका शेतात छापा घालीत त्यांच्या पथकाने तेथे सुरु असलेला वेश्याव्यवसाय उध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सदरील व्यवसाय करण्यास भाग पाडणार्याला अटक केली असून त्याच्या तावडीतून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील अनैतिक व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत श्रीरामपूर उपअधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी रात्री वांबोरी नजीकच्या गुंजाळे गावच्या शिवारात करण्यात आली. याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तत्काळ आपल्या पथकासह या परिसरात धाव घेतली. यावेळी वांबोरीतून नगरच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरील एका शेतात शेड उभारुन काहीतरी अवैध उद्योग सुरु असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानुसार एका बनावट ग्राहकाला सदर ठिकाणी पाठवून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा घातला.
या कारवाईत पोलिसांनी तीन परप्रांतीय मुलींची सुटका करीत त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली. पोलीस शिपाई रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिसांनी शेतमालक रवी उर्फ संजय राजू गायकवाड (रा.गुंजाळे) याच्या विरोधात महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 3, 4, 5, 7 व 8 अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. या कारवाईने वांबोरीसह राहुरीतील गुन्हेगारी वर्तुळाला मोठा हादरा बसला असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. उपअधीक्षक मिटके यांनी केलेल्या या कारवाईत राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार अकोलकर, हवालदार चंद्रकांत बर्हाटे, पोलीस नाईक पारधी, महिला पोलीस कोहोकडे, पोलीस शिपाई ताजणे, शिंदे, साखरे, नदीम शेख व ठोंबरे आदींचा सहभाग.